Dhurandhar 2 Collection : बॉलिवूड दिग्दर्शक आदित्य धर यांचा बहुप्रतीक्षित स्पाय थ्रिलर ‘धुरंधर 2’जगभरात प्रदर्शित झाला आणि पहिल्याच दिवशी या चित्रपटाने कमाईचे सर्व जुने विक्रम मोडीत काढले आहेत.
भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात पहिल्याच दिवशी 100 कोटींचा आकडा पार करणारा हा पहिलाच हिंदी चित्रपट ठरला आहे. रणवीर सिंगच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.
Dhurandhar 2 Collection : पेड प्रिव्ह्यूचा मोठा फायदा
चित्रपट प्रदर्शित होण्याच्या एक दिवस आधी म्हणजेच बुधवारी संध्याकाळी काही निवडक चित्रपटगृहांमध्ये याचे ‘पेड प्रिव्ह्यू’ ठेवण्यात आले होते. यातूनच चित्रपटाने तब्बल 43 कोटींची कमाई केली होती. यापूर्वी ‘स्त्री 2’ च्या नावावर असलेला 10 कोटींचा विक्रम ‘धुरंधर 2’ ने सहज मागे टाकला. यामुळे गुरुवारी पहिल्या दिवशी या चित्रपटाला मोठी आघाडी मिळाली.
Dhurandhar 2 Collection : पहिल्या दिवसाची एकूण कमाई
गुरुवारच्या सकाळ आणि दुपारच्या शोच्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने देशांतर्गत 103 कोटींची भर घातली आहे. पेड प्रिव्ह्यूचे 43 कोटी आणि पहिल्या दिवसाचे 103 कोटी मिळून एकूण कमाई 146 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. हिंदीसोबतच हा चित्रपट तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्येही प्रदर्शित झाला असून तिथूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः तेलुगू आवृत्तीने आतापर्यंत 2 कोटींहून अधिक गल्ला जमवला आहे.
‘जवान’ आणि ‘पठाण’चे रेकॉर्ड मोडले
146 कोटींच्या या विक्रमी कमाईसह ‘धुरंधर 2’ ने बॉलिवूडमधील आजवरच्या सर्व मोठ्या ओपनिंगला मागे टाकले आहे:
- जवान: 75 कोटी
- ॲनिमल: 64 कोटी
- पठाण: 57 कोटी
- स्त्री 2: 54 कोटी
भारतीय चित्रपटांच्या इतिहासात ‘पुष्पा 2’ (164 कोटी) नंतर ही दुसरी सर्वात मोठी ओपनिंग ठरली आहे. या चित्रपटाने ‘बाहुबली 2’ (121 कोटी) आणि ‘आरआरआर’ (133 कोटी) यांसारख्या दाक्षिणात्य चित्रपटांच्या पहिल्या दिवसाच्या कमाईलाही ओलांडले आहे.
चित्रपटाबद्दल थोडक्यात
रणवीर सिंगसोबतच या चित्रपटात आर. माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त आणि सारा अर्जुन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याआधी प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’च्या पहिल्या भागाने जगभरात 1,300 कोटींची कमाई केली होती. आता त्याचा सिक्वेल त्याही पेक्षा मोठी मजल मारेल, अशी चिन्हे दिसत आहेत.









