दिलजीत दोसांझ ‘बॉर्डर 2’ मधून बाहेर? पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत झळकल्याने मोठा वाद

Diljit Dosanjh

Diljit Dosanjh | पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) सध्या त्याच्या ‘सरदार जी 3’ चित्रपटामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर (Hania Aamir) पाहायला मिळाली होती. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतरही चित्रपटात पाकिस्तानी कलकारासोबत झळकल्याने दिलजीतवर टीका होता होती.

याच पार्श्वभूमीवर दिलजीतला सनी देओल आणि वरुण धवन यांच्या ‘बॉर्डर 2’ (Border 2) चित्रपटातून काढून टाकल्याच्या बातम्या पसरल्या होत्या. मात्र, आता दिलजीत अजूनही या चित्रपटाचा भाग असल्याची माहिती समोर आली आहे.

‘बॉर्डर 2’च्या निर्मितीशी संबंधित व्यक्तीने स्पष्ट केले की, “दिलजीतला चित्रपटातून काढून टाकल्याच्या बातम्या खोट्या आहेत. त्याची कास्टिंग 9 महिन्यांपूर्वीच झाली होती आणि चित्रपटाचे 50% शूटिंग पूर्ण झाले आहे.” यामुळे दिलजीत सध्या तरी ‘बॉर्डर 2’ मध्ये कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत एनडीटीव्हीने वृत्त दिले आहे.

या चित्रपटाचे शूटिंग सध्या पुण्यात सुरू आहे, आणि याचे दिग्दर्शन अनुराग सिंग करत असून, जे.पी. दत्ता यांची मुलगी निधी दत्ता निर्मिती करत आहे.

‘सरदार जी 3’मुळे वाद

‘सरदार जी 3’ च्या ट्रेलरमध्ये पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरचा समावेश आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतरही चित्रपट परदेशात प्रदर्शित केल्याने दिलजीतवर टीकेची झोड उठली आहे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (FWICE) ने दिलजीतवर भारतात बंदी घालण्याची धमकी दिली आहे.

त्यांनी ‘बॉर्डर 2’ चे निर्माते आणि सनी देओल यांना पत्र लिहून दिलजीतसोबतचे संबंध तोडण्याची मागणी केली आहे. FWICE ने म्हटले, “तुमचा निर्णय राष्ट्रीय हिताला प्राधान्य देणारा असेल आणि देशभक्तीचा संदेश देईल.”

FWICE ची कठोर मागणी

FWICE ने केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून दिलजीत दोसांझ आणि ‘सरदार जी 3’च्या निर्मात्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी दिलजीतचे पासपोर्ट आणि भारतीय नागरिकत्व रद्द करण्याची मागणी केली आहे. यावर दिलजीतने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही