राजा रघुवंशी हत्या प्रकरणावर येणार चित्रपट, देणार ‘हे’ नाव

Raja Raghuvanshi Murder Case

Raja Raghuvanshi Murder Case: मेघालयमध्ये आपल्या नवविवाहित पत्नीसह हनिमूनला गेलेल्या इंदूरच्या राजा रघुवंशी (Raja Raghuvanshi Murder Case) यांच्या हत्येने संपूर्ण देशात खळबळ उडवली होती. या घटनेत राजाच्या पत्नीचा व तिच्या प्रियकाराचा हात असल्याचे समोर आले होते.

आता या वास्तव घटनेवर आधारित चित्रपटाची (Movie on Raja Raghuvanshi murder Case) अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाला “हनीमून इन शिलाँग”हे नाव देण्याचा विचार असून, चित्रपटाचे दिग्दर्शन एस. पी. निंबावत करणार आहेत.

कुटुंबीयांची चित्रपटाला संमती

राजा रघुवंशी यांच्या कुटुंबीयांनी या चित्रपटासाठी संमती दिली आहे. “जर आम्ही माझ्या भावाच्या हत्येची कथा मोठ्या पडद्यावर आणली नाही, तर लोकांना सत्य कळणार नाही,” असे त्यांचे भाऊ बंधू सचिन रघुवंशी यांनी स्पष्ट केले. चित्रपटाच्या माध्यमातून मेघालयची खरी प्रतिमा समोर यावी, हीच आमची इच्छा आहे, असे दुसऱ्या भावाने म्हटले आहे.

दिग्दर्शक निंबावत यांनी सांगितले की, राजा रघुवंशीला विवाहानंतर विश्वासघात सहन करावा लागला. हा चित्रपट फक्त एक गुन्हेगारी घटना दाखवणार नाही, तर समाजाला एक संदेश देणार आहे की अशा घटना थांबायला हव्यात. चित्रपटाची कथा तयार झाली असून, कलाकारांची निवड अद्याप गुलदस्त्यात आहे.

इंदूर व मेघालयमध्ये होणार चित्रिकरण

चित्रपटाचे ८० टक्के चित्रीकरण इंदूरमध्ये होणार असून उर्वरित भाग मेघालयमधील विविध लोकेशन्सवर होईल. त्यामुळे प्रेक्षकांना मध्य प्रदेशसह ईशान्य भारतातील वास्तवदर्शी पार्श्वभूमी अनुभवायला मिळणार आहे.

दरम्यान, मे महिन्यात राजा रघुवंशी पत्नी सोनमसोबत मेघालयला हनिमूनसाठी गेले होते. मात्र, ते बेपत्ता झाल्यानंतर 2 जून रोजी त्यांचा मृतदेह सोहरा येथील एका खोल दरीत सापडला. या प्रकरणात पत्नी सोनम आणि तिचा कथित प्रियकर राज कुशवाह यांच्यासह आठ जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेने देशभरात मोठी चर्चा निर्माण केली होती.