Manache Shlok Movie Controversy: अभिनेत्री आणि दिग्दर्शिका मृण्मयी देशपांडेचा (Mrunmayee Deshpande) ‘मनाचे श्लोक’ हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून जोरदार वादात सापडला होता. पश्चिम महाराष्ट्रासहइतर काही ठिकाणी चित्रपटाच्या नावावर हिंदू संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला, ज्यामुळे प्रदर्शनानंतर चित्रपटाचे शो बंद पाडण्यात आले.
या सगळ्या गदारोळानंतर निर्मात्यांनी आणि मृण्मयी देशपांडेच्या टीमने चित्रपटाचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. आता हा चित्रपट ‘तू बोल ना’ (Tu Bol Na) या नव्या नावाने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘तू बोल ना’ हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रभर 16 ऑक्टोबर 2025 रोजी पुन्हा प्रदर्शित होत आहे.
चित्रपटाच्या वादाचे नेमके कारण काय?
‘मनाचे श्लोक’ या नावाला हिंदू जनजागृती समिती आणि समस्त हिंदू आघाडी यांसारख्या संघटनांनी जोरदार आक्षेप घेतला होता. हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते पराग गोखले यांच्या मते, ‘मनाचे श्लोक’ हा ग्रंथ भक्तीभावाने पूजनीय आहे. त्याचे नाव केवळ मनोरंजनासाठी वापरणे हे श्रद्धेचा अपमान करणारे आणि धार्मिक भावनांना ठेस पोहोचवणारे आहे.
समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांनी, ‘स्वातंत्र्याच्या नावाखाली धार्मिक प्रतीकांचा गैरवापर थांबवावा. अशा नावाने चित्रपट प्रदर्शित झाल्यास आंदोलन केले जाईल’, असा थेट इशारा दिला होता.
हा वाद वाढल्यानंतर सज्जनगड येथील समर्थ सेवा मंडळाने उच्च न्यायालयात चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणीही केली होती.
न्यायालयाची परवानगी असतानाही शो बंद
उच्च न्यायालयाने ‘मनाचे श्लोक’ चित्रपटाला प्रदर्शित होण्यास संमती दिली होती. त्यानुसार चित्रपट प्रदर्शित झाला, पण पुण्यासह काही ठिकाणी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी चित्रपटगृहांमध्ये घुसून चित्रपटाचे शो बंद पाडले.
या सगळ्या गोंधळामुळे प्रेक्षकांना चित्रपट पाहण्यासाठी कोणताही त्रास होऊ नये, तसेच चित्रपटगृहे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होऊ नये, यासाठी निर्मात्यांनी हे महत्त्वाचे पाऊल उचलले. मृण्मयी देशपांडेने सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘तू बोल ना’ या नव्या नावाची आणि 16 ऑक्टोबरच्या प्रदर्शनाची घोषणा केली.
मृण्मयी देशपांडे आपल्या पोस्टमध्ये चाहत्यांना आवाहन करताना म्हणाली की: ‘तू बोल ना’ – ‘मनाचे श्लोक’चा प्रवास नव्या नावाने सुरू होतोय, पण त्याच उत्साहाने! मनवा आणि श्लोक यांच्या मनांबरोबर प्रवासाला सुरुवात करूया 16 ऑक्टोबरपासून…
चित्रपटाचे नाव बदलले असले तरी कथानकाची आणि भावनांची अनुभूती तीच राहील, असा विश्वास मृण्मयीने व्यक्त केला आहे.
चित्रपटातील कलाकार
‘तू बोल ना’ या चित्रपटात मृण्मयी देशपांडे, राहुल पेठे, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे आणि करण परब अशी तरुण कलाकारांची फौज आहे. यासोबतच लीना भागवत, मंगेश कदम, शुभांगी गोखले आणि उदय टिकेकर हे ज्येष्ठ कलाकारही महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत.
हे देखील वाचा – गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! बिहारच्या ‘या’ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता