Phule Film Tax-Free Demand | महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित ‘फुले’ हा चित्रपट (Phule Film) 25 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करण्याची मागणी आता राज्यातील नेत्यांकडून केली जात आहे.
राज्यातील विरोधी पक्षांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ‘फुले’ चित्रपटाला (Phule Film) करमुक्त करण्याची आणि तो शाळांमध्ये उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून भारतातील सामाजिक सुधारणा आणि चळवळींचा इतिहास अधिक लोकांपर्यंत पोहोचेल, असा युक्तिवाद त्यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते जयंत पाटील यांनी हा चित्रपट करमुक्त करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून सामाजिक सुधारणांचा इतिहास अधिक लोकांपर्यंत पोहोचेल. तर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना, विशेषतः मुलींना शिक्षण घेता यावे यासाठी संघर्ष करणाऱ्या समाजसुधारकांचा लढा समजावा, अशी इच्छा व्यक्त केली आहे.
अभिनेता आणि चित्रपट निर्माते अनंत महादेवन यांनी दिग्दर्शित केलेला ‘फुले’ हा चित्रपट 25 एप्रिलला प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटावरून वाद देखील निर्माण झाला होता.
"फुले" चित्रपट टॅक्स फ्री करावा यासाठी मा. मुख्यमंत्री महोदयांकडे मी मागणी केली आहे.
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) May 2, 2025
माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देण्यासाठी लढणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई फुले यांचा संघर्षमय प्रवास प्रत्येकाने अनुभवायला हवा. या चित्रपटातून समाज उन्नतीसाठी उभारलेल्या… pic.twitter.com/25YZprgai2
जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून ‘फुले’ चित्रपटाला करमुक्त करण्याची मागणी केली. या चित्रपटात महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी समानता आणि समाजाच्या उद्धारासाठी केलेल्या संघर्षाचे चित्रण आहे. त्यांनी ‘एक्स’ वर पत्र शेअर करत म्हटले, “दलितांना पाण्याचा हौद खुला केला, शिक्षणासाठी दारे उघडे केली, स्त्री शिक्षणासाठी पाऊल टाकले इतकाच मर्यादित महात्मा फुले आणि सावित्रीमाईचा इतिहास नाही. तर त्याहूनही व्यापक काम महात्मा फुले आणि सावित्रीमाईनी करून ठेवले आहे. त्यांच्या कार्याचा प्रभाव इतका अफाट आहे की जसा 19 व्या शतकात त्यांच्या कार्याला विरोध केला गेला, तितकाच विरोध 21 व्या शतकात त्यांच्या चित्रपटाला झाला.”
ते पुढे म्हणाले, “माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देण्यासाठी लढणाऱ्या जोडप्याचा हा संघर्ष प्रवास प्रत्येकाने पाहायला हवा., असे म्हणत त्यांनी चित्रपट करमुक्त करण्याची मागणी केली आहे.
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी देखील हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त केला जावा आणि राज्यातील शाळांमध्ये दाखवण्याची मागणी केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे (VBA) प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही अशाच प्रकारची मागणी केली आहे.