Oscars 2026: जागतिक चित्रपटसृष्टीतील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ९८ व्या अकॅडमी पुरस्कारांची (ऑस्कर २०२६) पहिली यादी जाहीर झाली असून भारतीय सिनेमासाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे.
या वर्षी एकूण 317 चित्रपट ऑस्करसाठी पात्र ठरले आहेत, ज्यामध्ये 201 चित्रपटांनी मुख्य अशा ‘सर्वोत्कृष्ट चित्रपट’ (Best Picture) श्रेणीच्या शर्यतीत स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे, या यादीत भारताच्या ४ प्रमुख चित्रपटांचा समावेश झाला आहे.
ऑस्करच्या शर्यतीतील भारतीय चित्रपट:
१. Kantara: Chapter 1: ऋषभ शेट्टीचा अत्यंत अपेक्षित असलेला हा चित्रपट जागतिक स्तरावर चर्चेत आहे.
२. Tanvi The Great: ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट या मानाच्या यादीत पोहोचला आहे.
३. Tourist Family: एम. शशिकुमार यांचा हा चित्रपट तमिळ चित्रपटसृष्टीचे प्रतिनिधित्व करत आहे.
४. Mahavatar Narasimha: भारतीय पौराणिक कथेवर आधारित हा अॅनिमेटेड चित्रपटही या शर्यतीत सामील झाला आहे. या व्यतिरिक्त, राधिका आपटे अभिनित ‘सिस्टर मिडनाईट’ या चित्रपटानेही पात्र चित्रपटांच्या यादीत आपले स्थान निश्चित केले आहे.
अनुपम खेर यांची भावनिक पोस्ट
आपला चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत पात्र ठरल्याने अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिले की, “जगभरातील हजारो चित्रपटांमधून टॉप 200 चित्रपटांच्या यादीत स्थान मिळवणे हा आमच्या संपूर्ण टीमसाठी मोठा विजय आहे. चित्रपटगृहात १०० दिवस पूर्ण होत असतानाच ऑस्कर समितीकडून मिळालेली ही दाद आमच्या प्रामाणिक मेहनतीचे फळ आहे.”
कडक निकषांनंतर मिळाली पात्रता
ऑस्करच्या सामान्य श्रेणीत स्थान मिळवण्यासाठी काही कडक अटींचे पालन करावे लागते. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत अमेरिकेतील किमान एका मोठ्या महानगरातील व्यावसायिक चित्रपटगृहात तो चित्रपट प्रदर्शित होणे अनिवार्य असते. तसेच, संबंधित चित्रपट सलग ७ दिवस प्रदर्शित झालेला असावा आणि त्याचा कालावधी ४० मिनिटांपेक्षा जास्त असावा लागतो. भारतीय चित्रपटांनी हे सर्व निकष पूर्ण करून जागतिक सिनेमांसमोर तगडे आव्हान उभे केले आहे.
या यादीत भारतासोबतच ‘अवतार: फायर अँड ॲश’, ‘मिशन इम्पॉसिबल’ आणि ‘सुपरमॅन’ यांसारख्या मोठ्या हॉलिवूड चित्रपटांचाही समावेश आहे. आता संपूर्ण भारताचे लक्ष अंतिम नामांकनांकडे लागले असून, यापैकी कोणते चित्रपट ऑस्करच्या अंतिम फेरीत धडक मारतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.









