Paresh Rawal on Hera Pheri 3 | गेल्याकाही दिवसांपासून ‘हेरा फेरी 3’ चित्रपट चर्चेत आहे. ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी याआधी लोकप्रिय पात्र बाबूराव हे साकारण्यास नकार दिला होता. मात्र, आता ते त्यांच्या आयकॉनिक ‘बाबूराव गणपतराव आपटे’ या भूमिकेत पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत.
परेश रावल यांनी स्वतः या बातमीला दुजोरा दिला आहे. अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल ही मूळ त्रिकुट पुन्हा एकत्र येणार आहे.
गेले काही आठवडे परेश रावल यांच्या चित्रपटातील सहभागाबाबत अनिश्चितता होती. कायदेशीर आणि आर्थिक वादांमुळे त्यांनी चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता सर्व वाद मिटले असून, परेश रावल यांनी ‘हेरा फेरी 3’ मध्ये काम करण्याची तयारी दर्शवली आहे. एका पॉडकास्टमध्ये बोलताना ते म्हणाले, “जेव्हा एखादी गोष्ट प्रेक्षकांच्या मनाला भिडते, तेव्हा आपल्याला खूप काळजीपूर्वक काम करावे लागते. प्रेक्षकांचे प्रेम गृहीत धरता येत नाही. त्यांच्यासाठी आपण सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला पाहिजे.”, असे म्हणत त्यांनी चित्रपटात काम करण्याचे संकेत दिले आहेत.
का झाला होता वाद?
परेश रावल यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, ते ‘हेरा फेरी 3’ मधून बाहेर पडले आहेत. यानंतर अक्षय कुमारच्या ‘केप ऑफ गुड फिल्म्स’ या प्रॉडक्शन हाऊसने त्यांना 25 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईसाठी कायदेशीर नोटीस पाठवली होती. परेश रावल यांनी 11 लाख रुपयांचे साइनिंग अमाऊंट 15% वार्षिक व्याजासह परत केले होते.
रिपोर्टनुसार, चित्रपटाच्या पेमेंट रचनेबाबत (पेमेंट स्ट्रक्चर) त्यांची नाराजी होती. त्यांना मिळणारी 15 कोटी रुपयांची फी चित्रपटाच्या रिलीजच्या एक महिन्यानंतर मिळणार होती, आणि चित्रपट 2026 च्या शेवटी किंवा 2027 मध्ये रिलीज होण्याची शक्यता असल्याने हा विलंब वादाचा मुद्दा बनला होता.
मात्र, आता परेश रावल हे पुन्हा एकदा ‘हेरा फेरी 3’ लोकप्रिय बाबूराव हे पात्र साकारणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग 2025 च्या अखेरीस सुरू होण्याची शक्यता आहे.