Hera Pheri 3 | अभिनेता परेश रावल (Paresh Rawal) यांनी प्रियदर्शन दिग्दर्शित ‘हेरा फेरी 3’ (Hera Pheri 3) या चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या चाहत्यांचा मोठा हिरमोड झाला. परेश रावल यांनी निर्मात्यांसोबतच्या क्रिएटिव्ह मतभेदांमुळे (creative differences) हा चित्रपट सोडल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र, परेश रावल यांनी दिग्दर्शकासोबत कोणतेही मतभेद नसल्याचे स्पष्ट केले आहे.
रिपोर्टनुसार, परेश रावल यांनी चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने अभिनेता अक्षय कुमारने त्यांच्याविरोधात खटला दाखल केला आहे. अक्षयने परेश रावल यांच्याविरोधात 25 कोटी रुपयांचा दावा दाखल केला आहे. त्यानंतर आता परेश रावल यांनी चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय का घेतला? याबाबतची माहिती दिली.
एका मुलाखतीत परेश रावल म्हणाले, “मला माहित आहे की, हा निर्णय अनेकांसाठी धक्कादायक आहे. प्रियदर्शन दिग्दर्शित या चित्रपटात आम्ही तिघे मिळून चांगली केमिस्ट्री साधतो. मात्र, सध्या मला या चित्रपटाचा भाग होण्याची इच्छा नाही. त्यामुळे मी बाहेर पडलो.” त्यांनी पुढे सांगितले की, “सध्या तरी हा निर्णय अंतिम आहे. मात्र, भविष्यात काय होईल हे कोणालाच माहीत नाही.”
‘प्रियदर्शनसोबत कोणतेही मतभेद नाहीत’
प्रियदर्शनसोबत झालेल्या मतभेदांच्या अफवांना उत्तर देताना परेश रावल म्हणाले, “प्रियदर्शन आणि माझ्यामध्ये कोणतेही वाद नाहीत. त्यांच्याबद्दल मला खूप आदर आहे. आम्ही यापूर्वी एकत्र चांगले चित्रपट केले आहेत आणि भविष्यातही करत राहू. क्रिएटिव्ह मतभेद नाहीत आणि होण्याची शक्यताही नाही.” मानधन हे बाहेर पडण्याचे कारण होते का, असे विचारले असता ते म्हणाले, “माझ्या प्रेक्षकांच्या प्रेम आणि आदरापुढे कोणत्याही पैशाची तुलना होऊ शकत नाही. सध्या मला ही भूमिका करायची नाही, एवढेच.”
दरम्यान, परेश रावल यांच्या बाहेर पडण्याच्या निर्णयामुळे अक्षय कुमारने त्यांच्या सहकलाकारावर 25 कोटींचा दावा दाखल केला आहे. अक्षय कुमारने कराराचे उल्लंघन आणि ‘अव्यवसायिक वर्तना’मुळे हा दावा दाखल केला आहे. फिरोज नाडियादवालांकडून चित्रपटाचे हक्क विकत घेऊन अक्षय कुमार स्वतः या चित्रपटाची निर्मिती करत आहे. केप ऑफ गुड फिल्म्स (Cape of Good Films) या त्याच्या निर्मिती संस्थेच्या वतीने तो हा खटला दाखल करण्यात आला आहे.