Priya Marathe Death: गेल्या वीस वर्षांपासून मराठी आणि हिंदी टीव्ही मालिकांमधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्रिया मराठे (Priya Marathe) हिचं निधन झालं आहे. तीन वर्षांपासून कर्करोगाशी (Priya Marathe cancer) सुरू असलेली तिची झुंज अखेर आज (31 ऑगस्ट ) सकाळी 4 वाजता मुंबईतील मीरा रोड येथील निवासस्थानी संपली.
वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी जगाचा निरोप घेतल्याने संपूर्ण मराठी चित्रपट आणि टेलिव्हिजन विश्वावर शोककळा पसरली आहे.
प्रिया मराठेला तीन वर्षांपूर्वी कर्करोगाचे निदान झाले होते. मध्यंतरीच्या काळात तिने या आजारावर मात करून परदेशात एका नाटकाचा दौराही केला होता. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून तिच्या शरीरात कर्करोग पुन्हा पसरू लागला होता. उपचारांना तिचे शरीर प्रतिसाद देत नव्हते, अखेर शनिवारी सकाळी तिची प्राणज्योत मालवली.
प्रियाच्या निधनाने कलाविश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आज दुपारी 4 वाजता मीरा रोड येथील हिंदू स्मशानभूमीत तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
मराठी-हिंदी मालिकांमधून अभिनयाची छाप
23 एप्रिल 1987 रोजी ठाण्यात जन्मलेल्या प्रियाने 2005 साली ‘या सुखांनो या’ या मराठी मालिकेतून अभिनयाची सुरुवात केली. त्यानंतर ‘चार दिवस सासूचे’ आणि ‘तू तिथे मी’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये तिने काम केले. हिंदी मालिकांमध्येही तिने आपला ठसा उमटवला. ‘कसम से’ या मालिकेतून तिने हिंदी टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केले.
‘पवित्र रिश्ता’ मधील ‘वर्षा’ची भूमिका आणि ‘साथ निभाना साथिया’ मधील ‘भवानी राठोड’ ही खलनायिकेची भूमिका विशेष गाजली. ‘बडे अच्छे लगते है’ या मालिकेतही तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. तसेच, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मराठी मालिकेत तिने साकारलेली ‘गोदावरी’ची भूमिकाही प्रेक्षकांना खूप आवडली.
नाटक आणि चित्रपटांमधील प्रवास
मालिकांसोबतच प्रिया नाटक आणि चित्रपटांमध्येही सक्रिय होती. तिने ‘विघ्नहर्ता महागणपती’ आणि ‘किरण कुलकर्णी व्हर्सेस किरण कुलकर्णी’ यांसारख्या मराठी चित्रपटांतही काम केले. ‘Kon Mhanta Takka Dila’ आणि ‘A Perfect Murder’ यांसारख्या लोकप्रिय नाटकांमध्येही तिने दमदार अभिनय केला होता. 24 एप्रिल 2012 रोजी प्रियाने अभिनेता शंतनू मोघे यांच्याशी विवाह केला.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
‘Trump is dead’ ट्रेंडमुळे सोशल मीडियावर खळबळ, ट्रम्प यांच्या मृत्यूची अफवा कशी पसरली? जाणून घ्या