Priyanka Chopra SSMB 29 : बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा तब्बल 6 वर्षांच्या दीर्घ विश्रांतीनंतर पुन्हा भारतीय चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवत आहे. ‘बाहुबली’ आणि ‘RRR’ सारखे भव्य चित्रपट देणारे दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या आगामी ‘ग्लोबट्रॉटर’ (SSMB 29) या बहुप्रतिक्षित चित्रपटातून तिचे पुनरागमन होत आहे.
‘मंदाकिनी’चा दमदार फर्स्ट लूक
प्रियांकाचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर प्रदर्शित झाला. देसी गर्लचा हा लूक चाहत्यांना देखील आवडल्याचे पाहायला मिळत आहे. या चित्रपटात ती ‘मंदाकिनी’ नावाच्या एका खास व्यक्तिरेखेत दिसणार आहे. पोस्टरमध्ये प्रियांका पिवळ्या रंगाची साडी परिधान केलेली दिसत असली, तरी ती पारंपारिक नायिकेच्या चौकटीबाहेर जाऊन एका क्लिफवर उभी राहून बंदुकीने गोळी झाडताना दिसत आहे. हा लूक तिच्या व्यक्तिरेखेची दमदार अॅक्शन बाजू दर्शवतो, जी अत्यंत अनपेक्षित असणार आहे.
राजामौली यांनी स्वतः प्रियांकाचा लूक शेअर करत ‘जगभर भारतीय चित्रपटसृष्टीला नवी ओळख देणाऱ्या या अभिनेत्रीचे पुन्हा स्वागत! मंदाकिनीचे विविध रंग जग पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत,’ अशा शब्दांत तिचे स्वागत केले आहे. चित्रपटाचा नायक महेश बाबू यानेही प्रियांकाचा लूक शेअर करत, ‘आता तिचे आगमन झाले आहे… मंदाकिनी ला भेटा,’ अशी पोस्ट केली.
भव्य स्टारकास्ट आणि बजेट
‘ग्लोबट्रॉटर’ हा राजामौलींचा पुढचा मोठा प्रकल्प असून, हा चित्रपट सुमारे ₹1000 कोटींच्या भव्य बजेटमध्ये तयार होत असल्याची चर्चा आहे. चित्रपटाच्या मुख्य भूमिकेत महेश बाबू असून, त्याच्यासोबत प्रियांका चोप्रा आणि साऊथचा आणखी एक मोठा अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन झळकणार आहे.
दरम्यान, चित्रपटाशी संबंधित एक मोठा कार्यक्रम 15 नोव्हेंबर रोजी हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटीत आयोजित करण्यात आला आहे. याच कार्यक्रमात चित्रपटाचे अधिकृत टायटल जाहीर केले जाईल. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण जिओहॉटस्टारवर करण्यात येणार आहे.
हे देखील वाचा – Delhi Car Blast : दिल्ली कार स्फोट ‘दहशतवादी घटना’ घोषित; मोदींच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय









