Rajpal Yadav surrender : बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव (Bollywood actor Rajpal Yadav) याच्या अडचणीत मोठी वाढ झाली असून, सुमारे १५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ‘चेक बाऊन्स’ प्रकरणी ( cheque bounce cases)दिल्ली उच्च न्यायालयाने (High Court)त्याला ४ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत संबंधित तुरुंग अधीक्षकांसमोर आत्मसमर्पण (surrender )करण्याचे आदेश दिले आहेत.
राजपाल यादव यांनी २०१० साली इंदूर येथील सुरेंद्र सिंह यांच्याकडून ‘मेसर्स मुरली प्रोजेक्ट्स’ अंतर्गत ५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, हे कर्ज फेडण्यात ते अपयशी ठरले. २०१५ मध्ये त्यांनी दिलेला ॲक्सिस बँकेचा धनादेश खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने नाकारण्यात आला. त्यानंतर जिल्हा न्यायालयाने अनेकदा समझोत्याची संधी देऊनही यादव यांनी कर्जफेड केली नाही.
२ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या सुनावणीत न्यायमूर्ती स्वरण कांता शर्मा (Swaran Kanta Sharma)यांनी राजपाल यादव यांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. सुनावणीदरम्यान यादव यांच्या वकिलांनी ते सध्या मुंबईत व्यावसायिक कामात व्यस्त असल्याचे सांगत दिलासा मागितला. मात्र, “व्यावसायिक कामात व्यस्त असणे हे न्यायालयाच्या आदेशांचे पालन न करण्याचे कारण ठरू शकत नाही,” असे स्पष्ट करत न्यायालयाने ही विनंती फेटाळली.
याआधी २८ जून २०२४ रोजी उच्च न्यायालयाने शिक्षा तात्पुरती स्थगित करून प्रकरण मध्यस्थीसाठी पाठवले होते. त्यावेळी यादव यांनी तक्रारदार कंपनीशी तडजोड करण्याची तयारी दर्शवली होती. न्यायालयासमोर एकूण २.५० कोटी रुपये देण्याचे मान्य करण्यात आले होते. यात ४० लाख रुपये तत्काळ आणि उर्वरित २.१० कोटी रुपये हप्त्यांमध्ये देण्याचे ठरले होते.
मात्र, जून २०२४ पासून आतापर्यंत अनेकदा मुदतवाढ मागूनही एकही हप्ता वेळेत जमा झालेला नाही, असे न्यायालयाने नमूद केले. ना ४० लाख रुपये जमा झाले, ना २.१० कोटी रुपयांची रक्कम. डिमांड ड्राफ्टमधील त्रुटी दुरुस्त करण्यासाठीही ठोस पावले उचलली गेली नाहीत. १८ डिसेंबर २०२५ रोजी त्रुटी लक्षात येऊनही केवळ वेळवाढ मागण्यात आली, अशी नोंद न्यायालयाने केली.
या पार्श्वभूमीवर, आधी जमा केलेली रक्कम तक्रारदार कंपनीला देण्याचे निर्देश देत, राजपाल यादव यांनी ४ फेब्रुवारी २०२६ पर्यंत आत्मसमर्पण करावे, असे आदेश न्यायालयाने दिले.
हे देखील वाचा –
व्यापार करारावरून संसदेत वादळ; ‘देश अमेरिकेकडे गहाण’- राहुल गांधींचा मोदी सरकारवर गंभीर आरोप..
पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड; उड्डाणाआधीच धोका टळला









