Dhurandhar Collection: अभिनेता रणवीर सिंग याचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘धुरंधर’ ने जोरदार कमाई केली आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 27 कोटी रुपयांहून अधिक कमाई करून दमदार यश मिळवले आहे. प्रदर्शनापूर्वी या चित्रपटाची कमाई 15 ते 18 कोटी रुपयांदरम्यान असेल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता.
‘धुरंधर’ ने 27 कोटी रुपयांची कमाई करत ‘सैय्यारा’ (21.50 कोटी रुपये) या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईलाही मागे टाकले आहे.
रणवीरचा सर्वात मोठा ओपनर
‘धुरंधर’ हा रणवीर सिंगच्या कारकिर्दीतील सर्वाधिक ओपनिंग कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. यापूर्वी त्याचे यशस्वी ठरलेले चित्रपट ‘पद्मावत’ ने 24 कोटी रुपयांची, तर ‘सिम्बा’ ने पहिल्या दिवशी 20.72 कोटी रुपयांची कमाई केली होती.
हा चित्रपट 5 डिसेंबर, शुक्रवारी देशभरात प्रदर्शित झाला. यावेळी देशभरात 33.81% प्रेक्षकांनी चित्रपटाला हजेरी लावली होती. दिवसभरात 4,000 हून अधिक खेळ आरक्षित करण्यात आले होते आणि सायंकाळच्या वेळी 55% हून अधिक प्रेक्षक उपस्थित होते.
दीपिकाकडून कौतुक
चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर रणवीरची पत्नी आणि अभिनेत्री दीपिका पदुकोणने सोशल मीडियावर रणवीरच्या उत्कृष्ट अभिनयाबद्दल त्याचे कौतुक केले. तिने लिहिले, “‘धुरंधर’ पाहिला, आणि त्या 3.34 तासांचे प्रत्येक मिनिट योग्य आहे. त्यामुळे स्वतःवर एक उपकार करा आणि आत्ताच चित्रपटगृहात जा! @ranveersingh, तुझा खूप अभिमान वाटतो! संपूर्ण टीमचे अभिनंदन.”
या चित्रपटात संजय दत्त, अक्षय खन्ना, आर माधवन आणि अर्जुन रामपाल यांच्या प्रमुख भूमिका असून, सारा अर्जुन या अभिनेत्रीने साकारलेल्या भूमिकेबद्दलही उत्सुकता निर्माण झाली आहे. ‘धुरंधर’ चे लेखन, दिग्दर्शन आणि सह-निर्मिती आदित्य धर यांनी जिओ स्टुडिओज आणि B62 स्टुडिओजच्या बॅनरखाली केली आहे.
हे देखील वाचा – IndiGo Flight Cancellation : इंडिगोची विमानसेवा कधी पूर्ववत होणार? CEO ने दिली महत्त्वाची माहिती









