Dhurandhar Movie : बॉलिवूड सुपरस्टार रणवीर सिंगचा ‘धुरंधर’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर सुसाट धावत आहे. 2025 मधील सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरल्यानंतरही, आता या चित्रपटात केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या आदेशानुसार काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. न
वीन बदलांसह सुधारित चित्रपट 1 जानेवारी 2026 पासून देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे.
काय झाले आहेत बदल?
रिपोर्टनुसार, चित्रपट निर्मात्यांना काही विशिष्ट शब्द म्यूट (आवाज बंद) करण्यास आणि एका संवादात बदल करण्यास सांगण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने ‘बलोच’ हा शब्द चित्रपटाच्या थिएटर कटमधून हटवण्यात आला आहे. याशिवाय आणखी एका शब्दावर कात्री चालवण्यात आली असून एका संवादाची रचना बदलण्यात आली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला प्रेक्षकांना आता हे बदललेला ‘धुरंधर’ पाहायला मिळणार आहे.
वितरकांकडून चित्रपटगृहांना ई-मेल
31 डिसेंबर रोजी रात्री उशिरा देशातील सर्व चित्रपटगृह मालकांना वितरकांकडून ई-मेल प्राप्त झाले. यामध्ये जुना डिजिटल सिनेमा पॅकेज (DCP) बदलून नवीन आशय डाउनलोड करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मंत्रालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी निर्मात्यांनी ही तातडीची पावले उचलली आहेत. कोणत्या तांत्रिक कारणामुळे किंवा तक्रारीमुळे हे बदल सुचवण्यात आले, याबाबत अधिकृत तपशील अद्याप समोर आलेला नाही.
बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक कमाई
‘धुरंधर’ने प्रदर्शनाच्या अवघ्या 27 दिवसांत जागतिक स्तरावर तब्बल 1128 कोटी रुपयांची ऐतिहासिक कमाई केली आहे. या चित्रपटाची क्रेझ 2026 मध्येही कायम असून, सुधारित संवादांसह हा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘बलोच’ शब्दाव्यतिरिक्त इतर कोणता शब्द म्यूट केला आहे, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
हे देखील वाचा – Samsung चा मोठा धमाका! Galaxy Z Fold 6 वर चक्क 55,000 रुपयांची घसघशीत सूट; पाहा नवीन किंमत आणि फीचर्स














