Salman Khan | बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट्स (Galaxy Apartments) मध्ये जबरदस्ती घुसण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका पुरुष आणि एका महिलेला अटक केली आहे. ही घटना या आठवड्यात घडली असून, गुरुवारी पोलिसांनी अधिकृत माहिती दिली.
पोलिसांच्या माहितीनुसार, छत्तीसगड येथील रहिवासी जितेंद्र कुमार सिंह (वय 23) याने मंगळवारी सकाळी 9:45 वाजता सलमानच्या घराच्या परिसरात संशयास्पद हालचाली केल्याचे आढळले. सुरक्षारक्षकाने रोखल्यावर त्याने रागाच्या भरात आपला मोबाईल जमिनीवर आपटून फोडला. त्याच संध्याकाळी, तो एका रहिवाशाच्या गाडीच्या मागे गुपचूप इमारतीत घुसला, पण पुन्हा पोलिसांच्या तावडीत सापडला.
बांद्रा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, चौकशीत त्याने सांगितले की त्याला सलमानला प्रत्यक्ष भेटायचे होते. दुसऱ्या दिवशी, ईशा छाब्रा (वय 32) या महिलेनेही पहाटे 3:30 वाजता इमारतीत शिरण्याचा प्रयत्न केला आणि ती लिफ्टपर्यंत पोहोचली होती. पोलिसांनी स्पष्ट केले की, दोघांविरुद्ध अनधिकृत प्रवेशाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी 14 एप्रिल रोजी, गॅलेक्सी अपार्टमेंट्सबाहेर दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला होता. या हल्ल्यामागे बिश्नोई टोळीचा (Bishnoi gang) हात असल्याचे निष्पन्न झाले होते. बिश्नोई टोळीच्या सातत्याने येणाऱ्या धमक्यांमुळे सलमानला ‘Y-प्लस’ सुरक्षा कवच देण्यात आले असून, त्याने आपल्या निवासस्थानात मोठ्या प्रमाणात नूतनीकरण केले आहे.
या हल्ल्यानंतर काही महिन्यांतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते आणि सलमानचे जवळचे मित्र बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांची हत्या झाली. त्यामुळे गॅलेक्सी अपार्टमेंट्सबाहेरची सुरक्षा आणखी कडक करण्यात आली.