Salman Khan Supports Rajpal Yadav: बॉलिवूडचा ‘कॉमेडी किंग’ राजपाल यादव सध्या एका विचित्र परिस्थितीमुळे चर्चेत आहे. नुकत्याच पार पडलेल्या ‘स्क्रीन अवॉर्ड्स 2026’ मध्ये राजपाल यादवच्या ‘चेक बाऊन्स’ प्रकरणावरून त्याची थट्टा उडवण्यात आली. हा प्रकार अनेकांना आवडला नाही.
मात्र आता खुद्द सलमान खान राजपालच्या समर्थनासाठी पुढे सरसावला आहे. सलमानने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत राजपालच्या कामाचे कौतुक केले असून टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
नेमकी घटना काय?
मुंबईत पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्यात एका सूत्रसंचालकाने राजपाल यादवच्या जुन्या कायदेशीर प्रकरणाचा उल्लेख केला. फेब्रुवारीमध्ये ज्या चेक बाऊन्स प्रकरणात राजपालला काही दिवस तुरुंगात जावे लागले होते, त्यावर भाष्य करताना सूत्रसंचालक म्हणाला, “राजपाल भाई, डॉलर कितीही वर-खाली झाला तरी तुम्हाला तेवढेच पैसे परत करावे लागतील जेवढे तुम्ही उधार घेतले आहेत.” या कमेंटवर प्रेक्षकांमध्ये हशा पिकला असला तरी राजपाल यादव काहीसा अस्वस्थ दिसला.
त्याने “एकदा माझे म्हणणे तर ऐकून घ्या” असे म्हणत स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर नेटकऱ्यांनी याला ‘अतिशय असंवेदनशील’ म्हटले.
सलमान खानची भावनिक पोस्ट
वाढता वाद पाहून सलमान खानने एक्स (ट्विटर) वर राजपाल यादवसाठी एक संदेश लिहिला. सलमान म्हणाला, “राजपाल भाई, तुम्ही 30 वर्षांपासून या उद्योगात काम करत आहात. आम्ही सर्वांनी तुम्हाला वारंवार काम दिले आहे कारण तुम्हाला तुमची कला माहिती आहे आणि तुम्ही सिनेमात एक वेगळे मूल्य निर्माण करता. डॉलरचा दर वर असो किंवा खाली, तुम्हाला भरपूर काम मिळत राहील आणि ते याच देशात मिळेल. हेच वास्तव आहे.” सलमानने राजपालला मनापासून काम करत राहण्याचा सल्लाही दिला आहे.
राजपाल यादवने संपवला वाद
सलमानच्या पाठिंब्यानंतर काही वेळातच राजपाल यादवने एक व्हिडिओ शेअर केला. यात त्याने सूत्रसंचालक सौरभ द्विवेदी आणि झाकीर खान यांना टॅग करत म्हटले की, “ते दोघेही माझ्या धाकट्या भावासारखे आहेत आणि जे काही घडले ते केवळ गंमत म्हणून होते.” राजपालने हा वाद स्वतःहून संपवण्याचा प्रयत्न केला असला तरी सलमानच्या मदतीमुळे त्याचे चाहते भारावून गेले आहेत.












