Salman Khan Health: बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानने नुकतेच आपल्या एका गंभीर आजाराबद्दल मोठा खुलासा केला आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्याने चेहऱ्यावर परिणाम करणाऱ्या ट्राइजेमिनल न्यूराल्जिया (Trigeminal Neuralgia) आजारामुळे त्याला झालेल्या तीव्र वेदनांचा अनुभव त्याने सांगितला आहे.
टू मच विथ काजोल अँड ट्विंकल’ या शो च्या कार्यक्रमात बोलताना सलमानने या आजाराबद्दल माहिती दिली. ‘पार्टनर’ (Partner) चित्रपटाच्या सेटवर 2007 मध्ये याचे पहिले लक्षण दिसले, तेव्हापासून मागील 7 वर्षांपासून तो या वेदनांशी झगडत होता.
आपल्या गंभीर आजाराबद्दल बोलताना तो म्हणाला की, “मी ‘पार्टनर’चे शूटिंग करत असताना लारा दत्ता माझ्या बाजूला होती. तिने माझ्या चेहऱ्यावरचा केसांचा एक धागा बाजूला केला आणि मला विजेचा झटका बसल्यासारखा तीव्र त्रास झाला. मी विनोद केला की ‘वाह लारा, तू खूप ‘इलेक्ट्रिफाइंग’ आहेस!’ आणि तेव्हापासूनच हा त्रास सुरू झाला.”
59 वर्षीय अभिनेत्याने सांगितले की, या वेदनांमुळे त्याचे दैनंदिन जीवन कठीण झाले होते. “तुम्ही तुमच्या सर्वात मोठ्या शत्रूलाही अशा वेदना नको म्हणाल. मला सुमारे साडेसातवर्षे हा त्रास होता. दर चार-पाच मिनिटांनी अचानक चेहऱ्याला वेदना व्हायच्या.”
ब्रेकफास्ट करण्यासाठी त्याला दीडतास लागायचा आणि त्यानंतर तो थेट रात्रीच्या जेवणासाठी उठायचा. “एक ऑम्लेट (Omelette) खाण्यासाठी मला स्वतःला जबरदस्ती करावी लागायची, कारण मला ते चावता यायचे नाही. मला ते गिळण्यासाठी खूप वेदना सहन कराव्या लागत,” असे त्याने सांगितले.
सुरुवातीला अनेकांना हा दातांचा त्रास वाटला होता. या वेदना कमी करण्यासाठी तो दररोज 750 mg पेनकिलर्स घेत असे, असेही त्याने सांगितले.
काय आहे ‘ट्राइजेमिनल न्यूराल्जिया’?
रिपोर्टनुसार, ट्राइजेमिनल न्यूराल्जिया हा एक क्रॉनिक पेन डिसऑर्डर (Chronic Pain Disorder) आहे. ज्यामुळे चेहऱ्यामध्ये अचानक, तीव्र आणि विजेच्या धक्क्याप्रमाणे कमी वेळेसाठी वेदना होतात.
चेहऱ्यातून मेंदूपर्यंत संवेदी सिग्नल (Sensory Signals) पोहोचवणाऱ्या नसेवर (Trigeminal Nerve) दबाव किंवा जळजळ झाल्यास हा त्रास होतो. चेहरा घासणे, दात घासणे, खाणे किंवा थंड वाऱ्याचा स्पर्श यांसारख्या सामान्य गोष्टींनीही हा त्रास होऊ शकतो.
हे देखील वाचा – ट्रम्प यांचा नवीन टॅरिफ बॉम्ब; ब्रँडेड औषधांवर 100% कर; भारतीय कंपन्यांवर काय परिणाम होणार?