Stranger Things Finale: स्ट्रेंजर थिंग्ज (Stranger Things) या लोकप्रिय वेब सीरिजच्या चाहत्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. या मालिकेच्या पाचव्या भागाचा अंतिम एपिसोड 350 हून अधिक चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
‘द राईटसाईड अप’ असे शीर्षक असलेला हा शेवटचा भाग 31 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता (अमेरिकेतील वेळेनुसार) नेटफ्लिक्स आणि थिएटरमध्ये एकाच वेळी प्रदर्शित होईल आणि 1 जानेवारी 2026 पर्यंत त्याचे प्रदर्शन सुरू राहील.
स्ट्रेंजर थिंग्जचा पाचवा भाग तीन व्हॉल्युम्समध्ये प्रदर्शित होणार आहे:
- पहिला भाग (Volume 1): 26 नोव्हेंबर (एपिसोड 501 ते 504)
- दुसरा भाग (Volume 2): 25 डिसेंबर (एपिसोड 505 ते 507)
- अंतिम भाग (Finale): 31 डिसेंबर (एपिसोड 508)
थिएटर रिलीजमागची निर्मात्यांची भूमिका
स्ट्रेंजर थिंग्जचे निर्माते मॅट आणि रॉस डफर यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, अंतिम भाग स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर प्रीमियर होताच तो थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याबद्दल उत्सुकता व्यक्त केली आहे.
आधी होता विरोध
विशेष म्हणजे, यापूर्वी सप्टेंबरमध्ये नेटफ्लिक्सचे मुख्य कंटेंट अधिकारी बेला बाजारिया यांनी थिएटर रिलीजच्या कल्पनेला सुरुवातीला विरोध दर्शवला होता.
तेव्हा त्या म्हणाल्या होत्या, “स्ट्रेंजर थिंग्ज नेटफ्लिक्सवर खूप लोकांनी पाहिली आहे. त्याला लोकप्रियता, समुदायाचा सहभाग किंवा फॅन फॉलोइंगमध्ये कोणतीही कमतरता जाणवलेली नाही. मला वाटते की नेटफ्लिक्सवर रिलीज करणे म्हणजे चाहत्यांना जे हवे आहे ते देणे आहे.” मात्र आता नेटफ्लिक्सने आपला निर्णय बदलल्याचे दिसत आहे. स्ट्रेंजर थिंग्सचे चाहते अनेक महिन्यांपासून या सीरिजची वाट पाहत आहेत.
हे देखील वाचा – Aaditya to Expose Voting Scam : २७ ऑक्टोबरला उबाठा मेळावा आदित्य बोगस वोटिंग बॉम्ब फोडणार









