Sudhir Dalvi Health Update: ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांच्या तब्येतीबद्दल एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. 1977 मध्ये आलेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या गाजलेल्या चित्रपटातून साईबाबांची आयकॉनिक भूमिका साकारून घराघरांत पोहोचलेले 86 वर्षीय अभिनेते सध्या सेप्टिक इन्फेक्शन या जीवघेण्या संसर्गाशी झुंज देत आहेत.
त्यांना 8 ऑक्टोबर 2025 रोजी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे त्यांच्यावर वैद्यकीय देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.
वाढत्या वैद्यकीय खर्चामुळे कुटुंबाचा संघर्ष:
सुधीर दळवी यांच्या उपचारासाठी आलेला वैद्यकीय खर्च सध्या 10 लाख रुपयांहून अधिक झाला आहे. डॉक्टरांनी दिलेल्या अंदाजानुसार, उपचारांचा एकूण खर्च 15 लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. हा वाढता खर्च कुटुंबाच्या आवाक्याबाहेर असल्याने त्यांच्या कुटुंबीयांना सध्या मोठ्या आर्थिक संघर्षाला तोंड द्यावे लागत आहे.
या आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी कुटुंबीयांनी चाहत्यांना आणि चित्रपटसृष्टीतील सदस्यांना आर्थिक मदतीचे खुले आवाहन केले आहे. शिर्डीतील स्थानिक रहिवाशांनीदेखील 29 ऑक्टोबरपासून निधी संकलनाचे काम सुरू केले असल्याची माहिती समोर आली आहे.
रिद्धिमा कपूरच्या मदतीमुळे ट्रोलिंग:
या मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांची मुलगी रिद्धिमा कपूर साहनी हिने सुधीर दळवी यांच्या उपचारासाठी आर्थिक योगदान दिले. मात्र, तिने सोशल मीडियावर पोस्ट करून मदतीची माहिती दिल्याने तिला काही नेटकऱ्यांकडून ट्रोलिंगचा सामना करावा लागला.
रिद्धिमाने ‘मदत केली. तुम्ही लवकरात लवकर बरे व्हा’ अशी पोस्ट केली होती. यावर ‘मदत केली तर जाहीर करण्याची काय गरज?’ अशी टीका झाली. या ट्रोलर्सला उत्तर देताना रिद्धिमाने ‘आयुष्यात सर्वकाही दिखाव्यासाठी केलं जात नाही. गरजू व्यक्तीला मदत करणे हा सर्वात मोठा आशीर्वाद असतो,’ अशा शब्दांत आपली भूमिका स्पष्ट केली.
सुधीर दळवींचे अभिनय कारकीर्द:
सुधीर दळवी यांनी साकारलेली साईबाबांची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात ताजी आहे. अनेकांना त्यांच्या रुपात खरे साईबाबा दिसल्याच्या प्रतिक्रिया त्यावेळी मिळाल्या होत्या. याशिवाय, त्यांनी 1987 मध्ये आलेल्या रामानंद सागर यांच्या गाजलेल्या ‘रामायण’ मालिकेमध्ये ऋषी वशिष्ठ यांची भूमिका साकारली होती. तसेच, ‘जुनून’, ‘चांदनी’, ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’, आणि ‘जय हनुमान’ यांसारख्या अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.
हे देखील वाचा – Census 2027 : जनगणना 2027 ची तयारी सुरू! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यातून सुरू होणार पूर्व चाचणी









