Suniel Shetty on Marathi Language | शालेय शिक्षणातील हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयासंदर्भातील जीआर राज्य सरकारने रद्द केले आहेत. त्रिभाषा सुत्रावरून राज्यातील राजकारण गेल्याकाही दिवसांपासून तापले असल्याचे पाहायला मिळाले. त्यातच आता प्रसिद्ध बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सुनील शेट्टी (Suniel Shetty) यांनी मराठी भाषेबद्दल भावनिक प्रतिक्रिया दिली आहे.
शिर्डीतील साईबाबांचे (Saibaba) दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित केले. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकायला हवे, असे मत सुनील शेट्टीने व्यक्त केले.
सुनील शेट्टी म्हणाला की, “माझी जन्मभूमी जरी कर्नाटक असली तरी, माझी कर्मभूमी मुंबई आहे. मला मराठी नाही आली तरी चाललं असतं, पण मी मराठी बोलल्यावर तुम्हाला आणि सर्वांनाच बरं वाटतं. मी कर्मभूमीत राहून मराठी नाही बोललो, तर दुसऱ्यांना त्रास व्हायला नको, तो त्रास मला स्वतःला झाला पाहिजे.”
“मला वाटतं की, मला मराठी शिकायचं आहे आणि तुम्ही सगळे बोलतात तसं मराठी मला बोलायचं आहे,” असे म्हणत त्यांनी मराठी शिकण्याचा निर्धार व्यक्त केला. त्याचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
दरम्यान, सुमारे सहा वर्षांनंतर सुनील शेट्टीने शिर्डीत साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्याने साईबाबांवरील श्रद्धा आणि मंदिराच्या व्यवस्थेचे कौतुक केले.