Sunjay Kapur Will Controversy : अभिनेत्री करिश्मा कपूरचे घटस्फोटित पती संजय कपूर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मृत्यूपत्रावरून न्यायालयात खटला सुरू आहे. खटल्याच्या सुनावणीत करिश्माच्या मुलांनी असा दावा केला की, पिता संजय कपूर यांच्या मृत्यूपत्रात फेरफार करण्यात आला आहे. तसेच मृत्यूपत्रात अनेक चुका असून ते बनावट आहे.
करिश्मा आणि संजय या दाम्पत्याला समायरा आणि कियान अशी दोन मुले आहेत. न्या. ज्योती सिंह यांच्या पीठासमोर झालेल्या सुनावणीत करिश्माच्या मुलांच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला. संजय कपूर यांचे मृत्यूपत्र बोगस आहे. त्यात असंख्य चुका आहेत. कोणीतरी या मृत्यूपत्रातील मजकुरात आपल्या सोयीनुसार फेरफार केल्याचे स्पष्ट दिसत आहे. अन्यथा आपल्या मुलांवर जीवापाड प्रेम करणारे संजय कपूर मुलगी समायराचा पत्ता चुकीचा कसा देऊ शकतील आणि मुलगा कियानच्या नावाचे स्पेलिंग चुकीचे कसे लिहू शकतील, असे प्रश्न उपस्थित करत हे मृत्यूपत्र संजय कपूर यांनी तयार केलेले मृत्यूपत्र नाही, असा दावा जेठमलानी यांनी केला.