Varun Dhawan Mumbai Metro Pull ups : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन सध्या त्याच्या ‘बॉर्डर 2’ या चित्रपटाच्या यशामुळे चर्चेत आहे. मात्र, एका वेगळ्याच कारणाने तो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला. मुंबईतील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वरुणने मेट्रोने प्रवास करण्याचा निर्णय घेतला, पण या प्रवासादरम्यान त्याने केलेल्या एका कृतीमुळे मुंबई मेट्रो प्रशासनाने (MMMOCL) त्याला जाहीरपणे फटकारले आहे.
धावत्या मेट्रोतील तो स्टंट
वरुण धवन एका चित्रपटगृहात चाहत्यांना सरप्राईज देण्यासाठी निघाला होता. प्रवासादरम्यान त्याने मेट्रोतील ओव्हरहेड बार पकडून थेट पुल-अप्स काढायला सुरुवात केली. त्याच्याभोवती प्रवासी उभे असताना वरुणने केलेली ही स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद झाली आणि काही वेळातच हा व्हिडिओ व्हायरल झाला.
प्रशासनाचा कडक इशारा
मुंबई मेट्रोने हा व्हिडिओ आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर शेअर करत वरुणला कडक शब्दांत सुनावले आहे. मेट्रोने म्हटले आहे की, “तुमच्या ॲक्शन चित्रपटांप्रमाणेच या व्हिडिओसोबतही इशारा असायला हवा होता. महा मुंबई मेट्रोमध्ये असे प्रकार करू नका. आम्हाला समजते की मित्रांसोबत फिरणे कूल आहे, पण मेट्रोतील हँडल हे अशा प्रकारे लटकण्यासाठी नाहीत.”
प्रशासनाने पुढे असेही स्पष्ट केले की, अशा प्रकारच्या कृती ‘मेट्रो रेल्वे (ऑपरेशन्स अँड मेंटेनन्स) ॲक्ट, 2002’ अंतर्गत दंडनीय अपराध आहेत. यामुळे उपद्रव निर्माण करणे किंवा मालमत्तेचे नुकसान करणे या आरोपाखाली दंड आणि तुरुंगवासही होऊ शकतो.
बॉक्स ऑफिसवर ‘बॉर्डर 2’ ची घोडदौड
एकीकडे हा वाद सुरू असताना दुसरीकडे वरुणचा ‘बॉर्डर 2’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. सनी देओल, वरुण धवन आणि दिलजीत दोसांझ यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत 144.65 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग सिंग यांनी केले आहे.









