अंबरनाथ – अंबरनाथच्या प्रसिद्ध हेरंब मंदिरात आज पहाटे चोरी झाली. मंदिरातून चोरट्यांनी गणपतीचे तीन किलो चांदीचे दागिने लंपास केले. मंदिरातील चार दानपेट्यांमधील रोख रक्कमही चोरट्यांनी चोरून नेली आहे. याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.
अंबरनाथच्या खेर सेक्शन परिसरातील हेरंब मंदिरात आज पहाटे अडीच ते पावणे तीनच्या सुमारास मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडत दोन चोरटे मंदिरात शिरले. या चोरट्यांनी आधी सीसीटीव्हीच्या वायर तोडल्या. त्यानंतर मंदिरातील कपाट उघडून त्यातून रोख रक्कम चोरली. मंदिरातील अवजारे वापरून या चोरट्यांनी मंदिराच्या चार दानपेट्या फोडल्या. तसेच गाभाऱ्यात लॉकरमध्ये असलेले गणपतीचे तीन किलो चांदीचे दागिनेसुद्धा चोरून नेले. सकाळी मंदिरात पुजारी आल्यानंतर त्यांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी शिवाजीनगर पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पोलीस तपास सध्या सुरू आहे.