श्रीनगर – कारगिल विजय दिवसाच्या २५ व्या वर्धापनदिनानिमित्त आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाखमधील १९९९च्या युद्धवीरांना श्रद्धांजली वाहिली. काही लोक राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित अशा संवेदनशील विषयावर राजकारण करत आहेत. यावेळी केलेल्या भाषणात मोदी म्हणाले की, अग्निवीर योजनेला विरोध करणारे तेच लोक आहेत, ज्यांनी हजारो कोटींचे घोटाळे करून आपल्या भारतीय लष्कराला कमकुवत बनवले होते. अग्निवीर योजनेमुळे देशाची ताकद वाढली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढे म्हणाले की, २५ वर्षांपूर्वी भारताने कारगिल युद्ध केवळ जिंकले नाही तर सत्य, संयम आणि सामर्थ्याचे अद्भुत उदाहरण दिले. पाकिस्तानला छुप्या युध्दाच्या (प्रॉक्सी वॉर) माध्यमातून चर्चेत राहायचे आहे. त्यांनी त्यांच्या इतिहासातून काहीच शिकलेले दिसत नाही. यापूर्वी दहशतवादाबाबत त्यांचे सर्व प्रयत्न फसले होते. मी जिथून उभा आहे तिथून माझा आवाज दहशतवाद्यांपर्यंत पोहोचत असावा. त्यांचे मनसुबे कधीच यशस्वी होणार नाहीत. आमचे शूर जवान दहशतवादाला पूर्ण ताकदीने चिरडून टाकतील. शत्रूला चोख प्रत्युत्तर दिले जाईल. लडाख असो वा जम्मू-काश्मीर, भारत विकासासमोरील प्रत्येक आव्हानाला नक्कीच पराभूत करेल. लष्करातील सुधारणांना आमचे प्राधान्य आहे. अग्निवीर योजना हा त्याचाच एक भाग आहे. अनेक दशकांपासून लष्कराला तरुण बनविण्यावर संसदेत चर्चा होत होती. अनेक समित्यांमध्ये हा विषय मांडण्यात आला. मात्र हा बदल करण्याची इच्छाशक्ती यापूर्वी दाखवली गेली नाही. अग्निवीर योजनेमुळे देशाची ताकद वाढेल आणि देशातील कर्तबगार तरुणही मातृभूमीच्या सेवेसाठी पुढे येतील, हेच सत्य आहे.