अजय चौधरींवर ‘मातोश्री’ नाराज! सख्खा भाऊ शिंदे गटात सामील

मुंबई- शिवसेनेच्या लालबाग -परळ या बालेकिल्ल्यातील ज्येष्ठ आमदार अजय चौधरी हे शिवसेना विधिमंडळाचे गटनेते आहेत.मात्र तरीही त्यांना लोकसभा निवडणुकीच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे अजय चौधरी यांच्यावर ‘मातोश्री ‘ नाराज असल्याची चर्चा शिवसैनिकांमध्ये दबक्या आवाजात सुरू असल्याचे समजते. दुसरीकडे अजय चौधरी यांचे सख्खे धाकटे भाऊ संजय चौधरी हे शिवसेनेच्या शिंदे गटात सामील झाले आहेत.
शिवसेना फुटल्यानंतर आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर नागपूर अधिवेशनात आमदार अजय चौधरी यांनी एकनाथ शिंदे यांना पहिला पुष्पगुच्छ नेऊन दिला होता.ही घटना घडल्यापासून ‘मातोश्री’ अजय चौधरी यांना टाळत असल्याचे दिसून येत आहे. चौधरी यांच्या दोन कार्यक्रमांना शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची गैरहजेरी हीसुद्धा या चर्चेचा भाग बनली होती. तसेच अजय चौधरी यांनीही त्यांच्या भावासारखा भविष्यात वेगळा विचार केला तर त्यामुळे मूळ शिवसेना शाबूत ठेवण्याच्या दृष्टीने शिवसेनेचे कट्टर माजी आमदार दगडूदादा सपकाळ यांना सध्या ‘मातोश्री वर मान-सन्मान मिळत आहे.या बालेकिल्ल्याला कुठेही आणखी तडा जावू नये यासाठी शिवसेना नेत्यांकडून हा प्रयत्न केला जात असल्याचे बोलले जात आहे.संजय चौधरी हे शिवसेनेतील मोठे पदाधिकारी नाहीत.मात्र, ते आमदार अजय चौधरी यांचे भाऊ आहेत. त्यांच्यासोबत शिवसेनेच्या कट्टर महिला संघटक अनुराधा इनामदार यासुद्धा आज शिंदे गटामध्ये सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे शिवसेना नेत्यांनी आता आपला हा बालेकिल्ला सुरक्षित ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले असल्याचे सांगितले जात आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top