चेन्नई – तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी काल सोमवारी डीएमके अर्थात द्रविड मुन्नेत्र कळघमचे संस्थापक दिवंगत सी. एन. अण्णादुराई यांच्या नूतनीकरण केलेल्या स्मारकाचे आणि चेन्नईतील मरीना बीचवर राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत एम करुणानिधी यांच्या नवीन स्मारकाचे उद्घाटन केले.
द्रमुकचे कॅबिनेट मंत्री,खासदार आणि आघाडी पक्षाचे नेते, विदुथलाई चिरुथैगल काची नेते आणि खासदार थोल थिरुमावलावन, मारुमालार्ची द्रविड मुनेत्र कळघम नेते वायको, द्रविड कझगम नेते के वीरामानी, डावे पक्ष आणि काँग्रेसचे नेते तसेच अभिनेता रजनीकांत आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. पुष्पांजली अर्पण केल्यानंतर स्टॅलिन यांनी द्रमुक नेते यांच्या प्रतिमेचे अनावरण केले.सरकारने जारी केलेल्या निवेदनानुसार दोन्ही स्मारके ८.५७ एकर जागेवर बांधण्यात आली आहेत. कलाईगनरच्या स्मारकात अनेक आकर्षक वैशिष्ट्ये आहेत,ज्यात भूमिगत अत्याधुनिक डिजिटल संग्रहालयाचा समावेश आहे. ‘कलैग्नार उलागम’ असे नाव असलेले संग्रहालय द्रविडियन आयकॉनचे जीवन आणि कर्तृत्व दाखवते. ३९ कोटी रुपये खर्चून बांधलेल्या करुणानिधी यांच्या स्मारकाची ही टचस्क्रीन डिस्प्ले, एक लायब्ररी आणि सेल्फी पॉइंट्स इतर काही ठळक वैशिष्ट्ये आहेत.