अमेरिकेत हल्ल्यात जखमी झालेल्या भारतीय वंशाच्या विवेक तनेजा यांचा मृत्यू

वॉशिंग्टन – अमेरिकेत एका हॉटेलबाहेर एका इसमाने हल्ला केल्याने जखमी झालेले मूळ भारतीय वंशाचे अमेरिकन उद्योजक विवेक तनेजा यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.ते ४१ वर्षांचे होते.
विवेक तनेजा हे डायनामो टेक्नॉलॉजीज या कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष होते. २ फेब्रुवारी रोजी वॉशिंग्टनमधील शोटो रेस्टॉरंटच्या बाहेर तनेजा यांचे एका इसमाशी काही कारणावरून भांडण झाले होते. या भांडणादरम्यान त्या इसमाने तनेजा यांना जोराने ठोसा मारला. त्यामुळे ते फुटपाथवर कोसळले. त्यांचे डोके फुटपाथवर आदळल्याने ते गंभीररित्या जखमी झाले होते. तनेजा गंभीर झाल्याचे पाहताच हल्ला करणारा इसम पळून गेला. काही वेळाने त्या परिसरात गस्त घालणार्या पोलिसांना तनेजा जखमी अवस्थेत आढळले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुरुवातीला ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत होते. मात्र नंतर त्यांची प्रकृती खालावत गेली. अखेर बुधवारी त्यांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी वांशिकद्वेषातून झालेली हत्या असा गुन्हा नोंदविला असून त्या दृष्टीने पोलीस तपास करीत आहेत. तनेजा यांना जोरदार ठोसा मारणारा इसम परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्या आधारे पोलीस हल्लेखोराचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी हल्लेखोराला शोधण्यात मदत करण्याचे आवाहन जनतेला केले आहे. अमेरिकेत गेल्या काही महिन्यांपासून भारतीय वंशाच्या लोकांवर हल्ले होण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. त्यामुळे विवेक तनेजा प्रकरणाचा पोलीस गांभीर्याने तपास करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top