न्यूयॉर्क- अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ आता या दशकाच्या अखेरीस एक कृत्रिम तारा प्रक्षेपित करण्याच्या तयारीत आहे. नासाने या मोहिमेला लँडोल्ट मिशन असे नाव दिले आहे. या मोहिमेला खगोलशास्त्रज्ञ अर्लो लँडोल्ट यांचे नाव देण्यात आले आहे आणि ते २०२९ मध्ये प्रक्षेपित केले जाणार आहे. ‘नासा ‘ चा हा कृत्रिम तारा अमेरिकेच्या अवकाशात पृथ्वीपासून ३५,७८५ किलोमीटर अंतरावरच्या कक्षेत स्थापित केला जाणार आहे.फ्लोरिडा युनिव्हर्सिटीतील खगोलशास्त्राचे सहायक प्राध्यापक जेमी टेयर यांच्या मते, इतर ताऱ्यांभोवती परिभ्रमण करणाऱ्या ग्रहांवर महासागर अस्तित्वात आहेत की नाही आणि अशा ग्रहांवर जीवनाची उत्पत्ती होऊ शकते का, याचा या मोहिमेद्वारे शोध घेतला जाईल. या मोहिमेमुळे ताऱ्यांच्या सभोवतालची अशी ठिकाणे शोधता येतील, जिथे जीवसृष्टी असण्याची किंवा उगम होण्याची शक्यता आहे.याशिवाय हे मिशन एलियन्सच्या अस्तित्वासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे देऊ शकते.