आता खोदकाम करणारी मशीनच तुटली कामगारांची सुटका पुन्हा लांबणीवर

डेहराडून – उत्तरकाशी येथील सिलक्यरा १४ दिवसांपासून बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालू असले तरी या बचावकार्यात दररोज नवनवे अडथळे येत आहेत. काल ड्रिलिंग करणारे ऑगर मशीन तुटल्याने खोदकाम थांबवण्यात आले. तेव्हापासून बचावकार्य पूर्णपणे ठप्प पडले आहे. ऑगर मशीनचे तुकडे बाहेर काढून जोडल्यानंतरच मशीनचे काम पुन्हा सुरू होईल. त्याआधी व्हर्टिकल म्हणजे उभे ड्रिलिंग करण्याचाही विचार केला जात आहे. मात्र, त्यालाही काही दिवस लागणार असल्याने बोगद्यातील कामगारांची सुटका पुन्हा लांबणीवर पडली आहे.

बोगद्यात अडकलेल्या कामगारांना वाचवण्यासाठी बाहेर काढण्यासाठी ऑगर मशीनने खोदकाम केले होते. गुरुवारी रात्री या मशीनचे काम सुरू असताना तिचा प्लॅटफॉर्म तुटला होता. तो दुरूस्त करून काम पुन्हा सुरू झाले होते. त्यानंतर कामगारांना ८०० मिलीमीटर व्यासाच्या पाईपमधून सुखरूप बाहेर काढण्याचे मॉक ड्रिलही करण्यात आले होते. परंतु काल रात्री खोदकाम करताना ऑगर मशीन तुटले. त्याच्या पाती लोखंडी सळ्यांमध्ये अडकल्या. त्यामुळे काम पुन्हा बंद करावे लागले. हे तुटलेले मशीन बाहेर काढण्यासाठी आता हैदराबादहून प्लाज्मा कटर आणण्यात येणार आहे. ते इथे पोहोचून ऑगर मशीनचे तुकडे बाहेर काढायला आणखी काही दिवसांचा वेळ लागणार आहे. दरम्यान व्हर्टिकल ड्रिलिंग करण्याचीही चाचपणी केली जात आहे.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी म्हणाले की, सर्व कामगार सुखरूप आहेत. त्यांना पुरेशा प्रमाणात जीवनाश्यक वस्तू पुरवल्या जात आहेत. सध्या कामगारांना लवकरात लवकर कसे बाहेर काढता येईल, याकडे लक्ष लागले आहेत. ऑगर मशीनचे तुकडे उद्यापर्यंत काढण्यात येतील. त्यानंतर मानवी पद्धतीने काम केले जाईल. सगळ्या एजन्सीज सध्या एकत्र काम करत आहेत. व्हर्टिकल खोदकामही सुरू केले जाणार आहे.
आंतरारष्ट्रीय टनल एक्स्पर्ट अरनॉल्ड डिक्स म्हणाले की, ऑगर मशीन तुटली आहे. तिचे काम आता पूर्णपणे ठप्प झाले आहे. आता ऑगरचे काम पुन्हा होणार नाही.

नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथोरिटीचे सदस्य लेफ्टनंट जनरल सैयद अता हसनैन (निवृत्त) म्हणाले, हिमालयात तुम्ही एखादे काम करता, तेव्हा कुठलेही भाकित करता येत नाही. ही युद्धासारखीच स्थिती असते. त्यामुळे कामगारांच्या सुटकेसाठी सध्या कुठलीही डेडलाईन देण्यात आलेली नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top