आता पुण्यातील जाहिराती फलकांची तपासणी करणार

पुणे- मुंबईतील घाटकोपर येथील जाहिरात फलक कोसळल्यानंतर पुणे महापालिका प्रशासनाला अखेर जाग आली आहे. कारण शहरातील अधिकृत जाहिरात फलकांसाठी महापालिकेस सादर करण्यात आलेल्या स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी रिपोर्टनुसार पुढील दोन दिवसांत सर्व जाहिरात फलकांची तपासणी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डाॅ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत.

पुणे शहरात २,४४३ अधिकृत जाहिरात फलक आहेत. तर, आतापर्यंत १५६४ अनधिकृत फलकांवर कारवाई करण्यात आली आहे,असा दावा आयुक्तांनी केला आहे. शहरातील जाहिरात होर्डिंग्जची तपासणी न झाल्यास आणि एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी परिमंडळ उपायुक्तांवर निश्चित केली जाणार असल्याचे आकाशचिन्ह विभागाने काढलेल्या आदेशात नमूद केले आहे.मागील महिन्यातच वाघोली येथे अवकाळी पावसाने एक मोठा जाहिरात फलक कोसळला होता.त्यानंतर पावसाळी कामाच्या आढावा बैठकीत आयुक्तांनी स्वत: स्ट्रकचरल आॅडिटनुसार तपासणी करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, त्यानंतर अद्याप एकाही जाहिरात फलकाची तपासणी झालेली नसल्याचे वास्तव आहे.मात्र आता मुंबईच्या दुर्घटनेनंतर मनपा परिमंडळांनी पुढील दोन दिवसांत सर्व जाहिरात फलकांची तपासणी करावी. जाहिरात फलक अधिकृत नसल्यास ते तातडीने काढावे,अनधिकृत जाहिरात फलक आढळल्यास अथवा एखादी दुर्घटना घडल्यास संबंधित परिमंडळ उपायुक्तास जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई केली जाईल.जर अनधिकृत फलक उभारले, तर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top