नवी दिल्ली
आपचे पंजाबमधील माजी खासदार डॉ. धर्मवीर गांधी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. गांधी यांना भाजपच्या परनीत कौर यांच्याविरोधात लोकसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. पक्षप्रवेशावेळी पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वारिंग, प्रवक्ता पवन खेडा, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते प्रताप सिंग बाजवा आदी उपस्थित होते. धर्मवीर गांधी यांनी २०१५ मध्ये आम आदमी पक्षात अंतर्गत लोकशाही नसल्याचा आरोप करत पक्षाचा आणि खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या.
पक्षप्रवेशावेळी डॉ. धर्मवीर गांधी यांनी सांगितले की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विचारांचा प्रभाव पडूनच मी आज काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहे. भारत जोडो यात्रेच्या प्रवासात मी राहुल गांधींसोबत होतो. मला वारंवार लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत विचारले जाते, मात्र मी निवडणुकीच्या तिकिटासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश करत नसल्याचे स्पष्ट करू इच्छितो. पक्षाने मला योग्य उमेदवार ठरवून या निवडणुकीसाठी तिकीट दिल्यास मी निवडणूक लढविण्यास तयार आहे. भाजपा सरकारच्या काळात न्यायव्यवस्था आणि लोकशाहीची पायमल्ली झाली आहे. मला वयाच्या टप्प्यावरदेखील कोणत्याही तपास यंत्रणेची भीती वाटत नाही.