आमचे जहाज बुडणारे नाही! भाजपाचे ओव्हरलोड! ते बुडणार! उद्धव ठाकरे यांची निवडणूक तयारी सुरू

मुंबई- शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या आमदार, खासदार, संपर्कप्रमुख आणि जिल्हाप्रमुखांची बैठक आज शिवसेना भवनात पार पडली. या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने चर्चा झाली. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे म्हणाले की, आमचे जहाज बुडणारे नाही. भाजपाचे ओव्हरलोड झाले आहे. ते जहाज बुडणार आहे.
उद्धव ठाकरे हे गेले अनेक दिवस परदेशी होते. परदेशातून परतल्यावर त्यांनी पहिल्यांदाच आपल्या पक्षाच्या आमदार, खासदार, संपर्कप्रमुख आणि जिल्हाप्रमुखांना मार्गदर्शन केले. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे निर्देश दिले. यावेळी त्यांनी विरोधकांनाही प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, अमित शहा हे तीन पक्षांचे प्रमुख आहेत. ते अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचेही प्रमुख आहेत. सत्ता येते आणि जाते. सत्ता आल्यावर हुरळून जायचे नसते व सत्ता गेल्यावर दु:ख करायचे नसते. परत सत्ता मिळवण्यासाठी कष्ट, प्रयत्न करायचे असतात. ज्यांना आपण खूप काही दिले ते आता पक्ष सोडून जात आहेत. ते पक्ष सोडून गेले तरी आपल्या पक्षावर काही परिणाम होणार नाही. ज्याला सोडून जायचे त्याला जाऊ द्या. कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत भूमिका स्पष्ट करीत ते म्हणाले की, वैचारिक विरोध असेल, पण देशावर काही संकट आले तर
आम्ही कायम पंतप्रधानांच्या सोबत असू. आम्ही देशाच्या विरोधात नाही, तर सरकारच्या विरोधात आहोत. काश्मीर कालही आपले होते. आजही आपले आहे आणि उद्याही आपलेच राहील. एकवेळ भाजपा देशात राहणार नाही, पण काश्मीर देशातच राहील.
त्यांनी वन नेशन, वन इलेक्शनवरही भाष्य केले. ते म्हणाले की, देशात वन नेशन वन इलेक्शनचा अभ्यास सुरू आहे, कमिटी महाराष्ट्रात आहे. ते ठीक आहे, पण देशात निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पडल्या पाहिजेत. निवडणूक होते तेव्हा मुख्यमंत्री व पंतप्रधानांनी निवडणुकीच्या प्रचारात उतरू नये.

Share:

More Posts