आमदार अंतापूरकर भाजपात? अशोक चव्हाणांची भेट घेतली

नांदेड – विघानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी आज सकाळी भाजपाचे राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांची भेट घेतली. त्यामुळे अंतापूरकर लवकरच भाजपामध्ये प्रवेश करण्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार आणि शेकापचे नेते जयंत पाटलांचा पराभव झाला होता. या निवडणूक निकालानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोल यांनी क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवर कठोर कारवाई करणार असल्याचे जाहीर केले. ज्या आमदारांनी निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केले, त्या आमदारांच्या यादीत जितेश अंतापूरकर यांच्याही नावाची चर्चा आहे. याच अंतापूरकर यांनी आज अशोक चव्हाण यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. अंतापूरकर सुरुवातीपासूनच अशोक चव्हाणांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशानंतर काँग्रेसचे काही आमदार त्यांच्यासोबत जातील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र पक्षांतरबंदी कायद्यामुळे या आमदारांनी लगेच भाजपा प्रवेश करणे टाळले होते.