आयपीएलच्या फायनलमध्ये हैदराबादचा धुव्वा! कोलकाताने तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले

चेन्नई- आज सनराईज हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर यांच्यात आयपीएलच्या अंतिम फेरीचा सामना झाला .पण हा सामना एकतर्फी झाल्याने ही आयपीएलची फायनल आहे असेच वाटलेच नाही. फायनलसारख्या महत्वाच्या सामन्यात 113 इतक्या निच्चांकी धावसंख्येवर एखादा संघ बाद व्हावा यासारखे दुर्दैव नाही. पण आजचा दिवस कोलकाता नाईट रायडरचा होता. आजचा दिवस शाहरुख खानचा होता त्यामुळे कोलकाताच्या गोलंदाजांनी भेदक मारा करीत हैदराबादला अवघ्या 113 धावांत गुंडाळले आणि 8 गडी राखून विजय मिळवीत तिसऱ्यांदा आयपीएलच्या चषकावर आपले नाव कोरले.
आज आयपीएलच्या फायनलमध्ये हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली पण त्यांचा हा निर्णय आत्मघातकी ठरला. कारण हैदराबादच्या फलंदाजांनी तर रसेलने कोलकात्याच्या गोलंदाजांसमोर अक्षरशःलोटांगण घालून आपल्या कर्णधाराचा निर्णय चुकीचा ठरवला. पहिल्याच षटकाच्या चौथ्या चेंडूवर स्टार्कने अभिषेक शर्माला अवघ्या 2 धावांवर यष्टीरक्षकाकडे झेल द्यायला लावले. पाठोपाठ खतरनाक फलंदाज अशी ओळख असलेल्या हेडचा वैभव अरोराने शून्यावर त्रिफळा उडवला. अशा तऱ्हेने हैदराबादची सलामीची जोडी अवघ्या 6 धावांत तंबूत परतल्याने त्यांची केविलवाणी स्थिती झाली.
राहुल त्रिपाठी आणि एडम मार्काराम यांनी कोलकात्याच्या गोलंदाजांचा सामना करण्याचा प्रयत्न केला. पण राहुल त्रिपाठीला स्टार्कने 9 धावांवर रामन दीपच्या हाती झेल द्यायला भाग पाडले. तर हर्षित राणाच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक गुरबाजकडे झेल देऊन नितीश रेड्डीही 13 धावांवर तंबूत परतला. त्यानंतर हैदराबादच्या फलंदाजांची तंबूत जाण्याची रांगच लागली. वरून चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर शाहबाज अहमद अवघ्या 8 धावांवर नरीनकडे झेल देऊन माघारी फिरला. तर रसेलच्या गोलंदाजीवर अब्दुल समदने गुरबाजकडे सोपा झेल दिला त्याला फक्त 4 धावा करता आल्या. ज्या क्लासेनवर हैदराबादचा भरोसा होता त्याचा हर्षित राणाने 16 धावांवर त्रिफळा उडवला. कर्णधार कमिन्सने उनाड कटच्या साथीने संघाची धावसंख्या कशीतरी 100 पर्यंत नेली. पण सुनील नरीनने उनाडकटला 4 धावांवर पायचीत केले तर कमिन्सला 24 धावांवर रसेलने बादकरून हैदराबादचा डाव अवघ्या 18.3 षटकात 113 धावांवर आटोपला. कोलकाताच्या रसेलने 19 धावांत 3 तर स्टार्क व हर्षितने प्रत्येकी 2 बळी घेतले नरीन, अरोराने एकेक बळी घेतला.
दरम्यान लक्ष्य छोटे असल्याने कोलकाता आरामात जिंकणार हे नक्की होते पण कोलकाताचा सलामीवीर सुनील नरीन याला कमिन्सने दुसऱ्याच षटकात 6 धावांवर बाद केले. तर गुरबाजला शाहबाजने 39 धावांवर तंबूत धाडले. त्यानंतर वेंकटेश आणि श्रेयसने विजयासाठी आवश्यक असलेल्या धावा करून संघाला 8 गडी राखून विजय मिळवून दिला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top