बिजींग – संगणक क्षेत्रातील आघाडीची आयबीएम कंपनी आपले एक हजार कर्मचारी कमी करणार आहे. अमेरिकेतील ही कंपनी चीनमधील संशोधन व विकास केंद्र बंद करणार आहे. चीनमधील ग्राहकांच्या अधिक चांगल्या सेवेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे.चीनमधील आपल्या अनेक ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी आयबीएम ने आपले काम विविध लहान कंपन्यांना देण्याचे ठरवले असून यासाठी कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करण्यात येणार आहे. आयबीएमच्या चायना डेव्हलपमेंट लॅब व चायना सिस्टीम लॅब या दोन सहयोगी कंपन्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे बिजिंग, शांघाय आणि डालियन या शहरातील कंपनीची कार्यालये बंद होणार असून या ठिकाणी काम करणाऱ्या एक हजार कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागणार आहे. अमेरिका स्थित या कंपनीने आज घेतलेल्या एका अंतर्गत बैठकीत हा निर्णय घोषित केला. कंपनीने काही जणांना कामावरुन कमी करण्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असला तरी दोन सहयोगी कंपन्या पूर्णपणे बंद करण्याच्या वृत्ताला होकार दिला नाही.