आयोगाचा दणका! प्रचारक यादी बदलली भाजपाने एकनाथ शिंदे, अजित पवारांचे नाव वगळले

मुंबई – लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून 45 पारचा नारा देणार्‍या भारतीय जनता पार्टीला (भाजपा) राज्य निवडणूक आयोगाने दणका दिल्यानंतर भाजपाने आपल्या स्टार प्रचारकांच्या यादीतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री अजित पवार यांची नावे वगळली आहेत. शिंदे आणि अजित पवार हे भाजपाचे नेते नाहीत, असे असताना भाजपाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत त्यांची नावे कशी, असा थेट सवाल निवडणूक आयोगाने केला. त्यानंतर भाजपाने शिंदे आणि अजित पवार यांची नावे यादीतून वगळली.
राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकार्‍यांनी या संदर्भात राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि सर्व जिल्ह्यांच्या मुख्य निवडणूक अधिकार्‍यांना पत्र पाठविले असून, लोकप्रतिनिधीत्व कायदा-1950 मधील तरतुदीनुसार स्टार प्रचारक हे त्या त्या राजकीय पक्षाचेच नेते असू शकतात. अन्य पक्षाच्या नेत्यांचा कोणत्याही राजकीय पक्षाला आपल्या स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश करता येणार नाही, असे स्पष्ट केले.
भाजपाप्रमाणेच शिवसेना शिंदे गटानेही आपल्या स्टार प्रचारकांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची नावे आपल्या पक्षाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत समाविष्ट केली आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाने भाजपाच्या स्टार प्रचारकांच्या यादीवर आक्षेप घेत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. भाजपा अन्य पक्षाच्या नेत्यांची नावे आपल्या पक्षाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत टाकणे हे लोकप्रतिनिधीत्व कायद्यातील कलम 77 चे उल्लंघन आहे, असा आक्षेप शरद पवार गटाने आपल्या तक्रारीमध्ये नोंदविला होता. या तक्रारीची दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी आणि जिल्ह्यांच्या मुख्य निवडणूक अधिकार्‍यांना हे पत्र पाठविले.
भाजपाच्या वतीने राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी महाराष्ट्रातील प्रचारासाठी 40 प्रचारकांची यादी 26 मार्च रोजी निवडणूक आयोगाकडे सादर केली होती. मात्र निवडणूक आयोगाच्या पत्रानंतर यादीतून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची नावे वगळली आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top