मुंबई – मुंबईतील आरे डेअरीची १८११ दूध विक्री केंद्र (स्टॉल) महानंद डेअरीकडे सोपविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महानंद डेअरी सध्या तोट्यात आहे. महानंदच्या कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केले आहेत.अशा परिस्थितीत आरेचे स्टॉल महानंदच्या स्वाधीन करण्यामागे काळेबेरे आहे असा आरे स्टाॅलधारकांचा आरोप आहे .महानंदच्या नावाआडून हे स्टॉल केंद्राच्या राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या अखत्यारितील गुजरातच्या आनंद डेअरीच्या घशात घालण्याचा डाव आहे,असा संशय आरेच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला.आरेचे स्टॉल महानंदला दिल्यामुळे आरेचे स्टॉलधारक बेरोजगार होतील,हा मुद्दादेखील कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे.आरेचे स्टॉल महानंदकडे हस्तांतरीत करण्यात येत असल्याचे पत्र राज्याच्या दुग्धविकास खात्याच्या उपसचिव अश्विनी यमगर यांनी नुकतेच निर्गमित केले आहे.त्यानुसार आरेचे १८११ स्टॉल महानंदकडे वर्षाला १ रुपया एवढया नाममात्र भाड्यावर ३० वर्षांसाठी हस्तांतरीत करण्यात आल्याचे म्हटले आहे.सरकारने आरेचे स्टॉल महानंदकडे हस्तांतरीत करताना काही अटी घातल्या आहेत. त्यानुसार आरेच्या या स्टॉलवर आता फक्त महानंद ब्रॅंडचे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ विक्रीसाठी ठेवणे बंधनकारक आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने निश्चित केलेले भुईभाडे स्टॉल चालकाकडून वसूल करणे आणि पालिकेला भरणा करण्याची जबाबदारी महानंद डेअरी प्रशासनावर टाकण्यात आली आहे.आरेची ही दूधविक्री केंद्र महानंदला अन्य कोणालाही हस्तांतरीत करता येणार नाहीत.आरेचे स्टॉल महानंदकडे हस्तांतरित करण्याचा उद्देश महानंदचे दूध संकलन आणि विक्री वाढ व्हावी हा आहे,असे आदेशात म्हटले आहे. मात्र खरे कारण आनंदला स्टाॅल द्यायचे हे असल्याची तक्रार आहे .
