दिसपूर – आसाम राज्यातील पूरस्थिती अत्यंत गंभीर झाली असून २९ जिल्ह्यांमधील १६ लाखांहून अधिक लोक पुरात अडकले आहेत. पुरामुळे गेल्या दोन दिवसांत आणखी ८ जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या ५२ वर पोहोचली आहे. पूरस्थितीमुळे ३ ते ४ जण बेपत्ता असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.आसाममध्ये गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस पडत असून त्यामुळे ब्रम्हपुत्रा आणि तिच्या उपनद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. राज्यभरातील १०५ महसूल मंडळातील एकूण २८०० गावे पुरामुळे बाधित झाली असून ३९ हजार ४०० हेक्टर क्षेत्रावरील शेतीचे नुकसान झाले आहे. पुरामुळे जागतिक वारसास्थळ असलेल्या काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातील १७८ वन तपासणी नाके हलवण्यात आली असून येथील प्राण्यांचेही जवळच्या टेकड्यांवर स्थलांतर केले आहे. प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी उद्यान प्राधिकरणाने वाहतूक वळवण्याचे आदेश दिले असून अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. ब्रह्मपुत्रा, बराक आणि त्यांच्या सर्व उपनद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत असून बुऱ्हिडीहिंग नदी पुराच्या सर्वोच्च पातळीवरून वाहत आहे. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी पूरस्थितीची हवाई पाहणी केली असून या नैसर्गिक आपत्तीवर नियंत्रण ठेवणे आपल्या हातात नाही असे म्हटले आहे. दरम्यान मणिपूर व अरुणाचल प्रदेशातही जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे.
