इक्वेडोर – दक्षिण अमेरिकेतील देश इक्वेडोरच्या महिला लोकप्रतिनिधी डायना कारनेरो (२९) यांची अज्ञात हल्लेखोरांनी दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या केली. डायना इक्वेडोरच्या संसद सदस्य आहेत. मोटरसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यात अगदी जवळून गोळ्या झाडल्या. त्यानंतर हल्लेखोर फरार झाले.
डायना या गुयास नारंजल परिसरातील खड्डेमय रस्त्यांचे व्हिडिओ चित्रण करीत होत्या. त्यावेळी त्यांच्या आसपास अनेक लोक होते. मात्र सर्व काही इतक्या अकल्पित आणि अचानक झाले की लोक अवाक होऊन पाहातच राहिले.
रस्त्यात रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या डायना यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र रुग्णालयात दाखल करून घेण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता.
पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र अद्याप या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेले नाही.
दरम्यान, डायना यांच्या हत्येवर इक्वेडोरचे माजी राष्ट्राध्यक्ष राफेल कोरेया यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. ‘ अवघ्या २९ वयाच्या डायना यांचा अशा पध्दतीने हत्या होणे ही अत्यंत दुःखदायक आणि लाजिरवाणी घटना आहे ‘,अशा शब्दात कोरेया यांनी आपल्या भावना सोशल मीडियावर केलेल्या पोस्टद्वारे व्यक्त केल्या आहेत.
इक्वेडोरमध्ये हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. देशातील एका कुख्यात गँगचा म्होरक्या अॅडेल्फो मॅकीयास काही दिवसांपूर्वी तुरुंगातून सुटला आहे. तेव्हापासून देशात हिसाचाराच्या घटना वाढल्या आहेत. परिस्थिती एवढी बिघडली आहे की राष्ट्राध्यक्ष डॅनियल नोबोआ यांनी देशात आणिबाणी जाहीर केली आहे.