इराणमध्ये प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शकाची पत्नीसह हत्या

तेहरान

प्रसिद्ध इराणी चित्रपट दिग्दर्शक दारियुश मेहरजुई आणि त्यांच्या पत्नीची अज्ञात हल्लेखोरांनी घरात घुसून हत्या केल्याचे उघडकीस आले. दारियुश मेहरजुई आणि त्यांची पत्नी वहिदेह मोहम्मदीफर हे त्यांच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळले. त्यांच्या मानेवर धारदार चाकूने वार केल्याचे आढळले. सरकारी वृत्तसंस्था इस्लामिक रिपब्लिकचे अधिकारी हुसेन फैझेली यांनी याबाबत माहिती दिली.

दारियुश यांची मुलगी मोना मेहरजुई शनिवारी रात्री घरी गेली असता, तिला आई-वडिलांचे मृतदेह दिसले. तिने याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन या प्रकरणाच्या पुढील तपासाला सुरुवात केली. दरम्यान, काही आठवड्यांपूर्वी दारियुश यांना यांच्यावर चाकूने हल्ला करण्याची धमकी मिळाली होती. याबाबत त्यांनी त्याच्या सोशल मीडियावर तक्रारही केली होती. १९७० च्या दशकाच्या सुरुवातीस दारियुश यांना वास्तववादावर आधारित इराणी चित्रपटाच्या ‘न्यू वेव्ह’ चळवळीचे सह-संस्थापक अशी ओळख मिळाली. त्यांना १९९८ मध्ये शिकागो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘सिल्व्हर ह्यूगो’ आणि १९९३ मध्ये सॅन सेबॅस्टियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘गोल्डन सीशेल’ पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या हत्येमुळे इराणमधील मनोरंजन विश्वात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top