‘इसिस’मध्ये गेलेल्या ब्रिटिश मुलीचे नागरिकत्व फेटाळले

लंडन- आपल्या किशोरवयीन वयात इस्लामिक स्टेट या दहशतवादी गटात सामील होण्यासाठी गेलेल्या शमीमा बेगम या मुलीचे ब्रिटिश नागरिकत्व परत मिळवण्याचा प्रयत्नही अयशस्वी झाला असून सुरक्षेच्या कारणास्तव ब्रिटिश न्यायालयाने तिला पुन्हा ब्रिटनचे नागरिकत्व बहाल करायला मनाई केली आहे. शमीमा ही २०१५ साली आपल्या दोन मित्रांसह लंडनमधील आपल्या घरातून सीरियाला इसीस या दहशतवादी संघटनेच्या कामासाठी गेली होती.

ब्रिटनच्या न्यायालयाने शुक्रवारी तिच्यासंदर्भात दिलेल्या पूर्वीच्या न्यायाधिकरणाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले असून २०१९ मध्ये सरकारने तिचे नागरिकत्व काढून घेण्याचा घेतलेला निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळे २०१९ सालापासून सिरियातील निर्वासित छावणीत राहणारी शमीमा ब्रिटनमध्ये येऊ शकणार नसून ती राज्यविहिन म्हणून तिथेच राहणार आहे. दरम्यान ती या निर्णयाला आव्हान देऊ शकते असेही काही कायदेतज्ञांचे मत आहे. ती ब्रिटनच्या सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याचा प्रयत्न करू शकते.
शमीमा बेगमचे प्रकरण ब्रिटनमध्ये चर्चेचा असून एका पत्रकाराने फेब्रुवारी २०१९ मध्ये सीरियन निर्वासित शिबिरात तिची मुलाखत घेतली होती. आपल्याला घरी परतायचे असल्याचे तिने पत्रकार अँथनी लॉईडला सांगितले होते. त्यानंतर त्यावेळचे गृहसचिव साजिद जाविद यांनी राष्ट्रीय सुरक्षेचे कारण देऊन तिचे नागरिकत्व रद्द केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top