इस्लामचा अवमान करणारा व्हिडिओ मराठी विद्यार्थ्याची हकालपट्टी

श्रीनगर – इस्लाम धर्मीयांच्या धार्मिक भावना दुखावणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी श्रीनगरच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) मधील प्रथमेश शिंदे या मराठी विद्यार्थ्यावर जम्मू-काश्मीर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एनआयटीनेही या विद्यार्थ्याची हकालपट्टी केली आहे. विशेष म्हणजे, प्रथमेशने जो व्हिडिओ शेअर केला आहे, तो आधीच जगभरातील कोट्यवधी लोकांनी पाहिला आहे. तरीही प्रथमेशवर कारवाई करण्यात आली आहे.
मूळचा बिहारचा असलेल्या मराठमोळ्या प्रथमेश शिंदे याने इस्लाम धर्माबद्दलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला होता. यात हमास या दहशतवादी संघटनेच्या नेत्याचा मुलगा इस्लाम धर्माबद्दल शेरेबाजी करताना दिसत आहे. त्यानंतर एनआयटीमधील काही विद्यार्थ्यांनी त्याचा स्क्रीन शॉट काढून तो शेअर केला. त्याचा संबंध इस्लामचे प्रेषित पैगंबर यांच्या अवमानाशी जोडण्यात आला. त्यात या विद्यार्थ्याच्या कथित मुस्लीम मैत्रिणीच्या कथानकाचीही भर घालण्यात आली. त्यानंतर श्रीनगर एनआयटीमध्ये प्रथमेशविरोधात निदर्शने करण्यात आली. चलो एनआयटी आणि प्रथमेशला फाशी द्या, हे ट्रेंडही सोशल मीडियावर चालवण्यात आले. ते हमासचे समर्थन करणार्‍या व्हेरिफाइड हँडलवरूनही चालवण्यात आले. काही विद्यार्थ्यांनी प्रथमेशविरोधात तक्रार दाखल केली. प्रकरण गंभीर होत असल्याचे पाहून प्रथमेश विरोधात निगेन पोलीस ठाण्यात आयपीसीच्या कलम 295-ए, 153-ए, 153 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यावर एनआयटीच्या शिस्तपालन समितीने प्रथमेशची हकालपट्टी केली आहे. आता प्रथमेशच्या समर्थनार्थ आणि विरोधात सोशल मीडियात जोरदार प्रचार सुरू आहे. प्रथमेशवर गुन्हा दाखल झाल्यावर त्याच्या समर्थनार्थ हिंदू विद्यार्थ्यांनीही घोषणाबाजी करत एनआयटीत मोर्चा काढला. काश्मीरचे पोलीस महासंचालक व्ही. के. बिरदी म्हणाले की, एनआयटीमधील विद्यार्थ्यांनी एका बिगर मुस्लीम विद्यार्थ्याने अपमानास्पद धार्मिक टिप्पणी केल्याचा आरोप केला. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर एनआयटीच्या एका अधिकार्‍याने सांगितले की, प्रथमेश शिंदे या विद्यार्थ्याला निलंबित करण्यात आले असून, यापुढे तो एनआयटीच्या कोणत्याही परीक्षेला बसू शकणार नाही. एवढेच नव्हे, तर यापुढे प्रथमेश शिंदे एनआयटीच्या हॉस्टेलमध्येही राहू शकणार नाही. त्याला हॉस्टेल तत्काळ रिकामे सोडण्याची सूचना दिली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top