लखनौ – उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. पावसामुळे दहा जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली.हिमाचल प्रदेशमध्ये ३३ रस्ते पूरस्थितीमुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. बिहारमध्ये १३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून बिहारला आज इशारा देण्यात आला.
उत्तर प्रदेशच्या अमेठीतील पोलीस अधीक्षक कार्यालयात पावसाचे पाणी शिरले. आतमध्ये अडकलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करावे लागले.गोंडा, आंबेडकरनगर, बहराईच, बुलंदशाह, जौनपूर, सुलतानपूर आणि अयोध्या आदि ठिकाणी आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली. बिहारच्या पूर्व आणि पश्चिम चंपारण, अररिया, किशनगंज, गोपालगंजमध्ये पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला.हिमाचलमध्ये ३३ रस्ते बंद करण्यात आले.त्यांपैकी सिरमौरमध्ये १२, कांगडामध्ये १०, मंडीमध्ये ८, कुलूमध्ये २ आणि शिमलामधील १ रस्त्याचा समावेश आहे.
								
								
								
								
								
				
															
								
								
								
								
								
								








