उद्धव ठाकरेंचा महायुतीला तिहेरी धक्का तेली, साळुंखे, बनकरांचा ‘उबाठा’त प्रवेश

मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंना महायुतीला तिहेरी धक्का देण्यात यश मिळाले. सावंतवाडीतील एकेकाळचे नारायण राणे यांचे निकटवर्तीय भाजपा नेते माजी आमदार राजन तेली, सांगोल्याचे माजी आमदार दीपक साळुंखे यांनी आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. तर सिल्लोड मतदारसंघातील भाजपा नेते सुरेश बनकर यांनीही हाती शिवबंधन बांधले. ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर प्रवेश सोहळा पार पडला. या पक्षप्रवेशामुळे अनेक राजकीय समीकरणे बदलतील, असे म्हटले जात होते.
राजन तेली सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. परंतु, महायुतीमध्ये ही जागा शिवसेना शिंदे गटाकडे असणार आहे. हा मतदारसंघ आपल्याकडे घ्यावा, अशी मागणी तेली यांनी भाजपाकडे केली होती. मात्र, पक्षनेतृत्वाने त्यांच्या मागणीची दखल घेतली नाही. त्यामुळे राजन तेली यांनी काल भाजपाचा सावंतवाडी विधानसभा प्रमुखपदाचा आणि सदस्यपदाचा राजीनामा दिला होता. आज ते उबाठा गटात परतले. कारण मूळचे ते शिवसैनिकच आहेत. सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघातील भाजप नेते सुरेश बनकर यांनी आज ठाकरेंचे शिवबंधन बांधले आहे.
पक्षप्रवेशावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, आता हराम्यांना घालवल्याशिवाय आराम नाही अशी गर्जना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली. पुढे ठाकरे म्हणाले, डॉक्टरांनी मला आराम करण्याचा सल्ला दिला आहे. पण आराम करायचा तरी किती? आधी हराम्यांना घालवायचे आहे, आता आराम नाही. आज कामाला सुरुवात केली आणि मुहूर्त चांगला आहे. आबांसारखा गडी शिवसेनेत सामील झालेले आहेत. साळुंखेंनी आबांच्या हातात मशाल दिली आहे, याचा अर्थ प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे. आता ही मशाल कशी पेटवायची आणि कुणाला चटके द्यायची हे तुम्ही ठरवायचे आहे. ही निवडणूक सोपी नाही. आजपासून संपूर्ण मतदारसंघात आपली मशाल घराघरात पोहोचली पाहिजे. तसेच हे गद्दार नुसते गद्दार नाहीत तर बरेच खोके घेऊन बसलेले आहेत. धनुष्यबाण आणि मशाल असा संभ्रम ते निर्माण करतात. आपले निवडणूक चिन्ह मशाल आहे. ही मशाल तुम्हाला आतापासून घराघरात न्यावी लागेल. सांगोल्याचा आधीचा आमदार जरी गद्दार झाला तरी सांगोलेकर माझ्यासोबत आहेत हे तुम्ही दाखवून द्या. मला खात्री आहे या शब्दाला तुम्ही जागाल आणि आपला आमदार निवडून आणाल. त्यामुळे प्रचाराला आणि जिंकल्यानंतरही सांगोल्याला येईन.