उद्धव ठाकरेंप्रमाणे अजित पवारांनाही फटका? भाजपाचे 9 जागांचे आश्‍वासन! 4च देणार

मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासंदर्भात भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात गेले काही दिवस जोरदार वाटाघाटी सुरू आहेत. जागावाटप ठरवण्यासाठी दिल्लीतही काल रात्री उशिरापर्यंत तिन्ही पक्षांची बैठक घेण्यात आली. मात्र, या वाटाघाटींमध्ये भाजपाने मित्रपक्षांना खूपच कमी जागा देण्याची तयारी दाखवली आहे. खास करून भाजपाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केवळ चारच जागा दिल्या जाणार असल्याने अजित पवार नाराज झाले आहेत. भाजपाने उद्धव ठाकरे यांना शब्द देऊन फिरवला, त्याच पद्धतीने आता अजित पवार यांनाही फटका मिळणार आहे! भाजपाने अजित पवाराना 9 लोकसभा मतदारसंघात उमेदवारीचे आश्‍वासन दिले होते. मात्र आता केवळ 4 जागांवर त्यांची बोळवण केली जाणार असल्याची चर्चा आहे.
दोन दिवसांपूर्वी महायुतीच्या घटक पक्षांची मुंबईत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक पार पडली होती. या बैठकीपूर्वी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांची एक वेगळी बैठक पार पडली. महायुतीच्या जागावाटपामध्ये भाजपाचा वरचष्मा असणार, हे त्यावेळीच जवळपास निश्चित होते. भाजपाने शिवसेना शिंदे गटाला 9 जागा देऊ केल्या आहेत. शिंदे गटाचे 13 खासदार आहेत. त्यामुळे माझ्या सर्व खासदारांना उमेदवारी हवी ही शिंदेंची मागणी असताना भाजपा त्यांना 9 जागाच देण्यास तयार आहे. त्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या वाट्याला केवळ 4 जागा आल्या आहेत. त्यामुळे अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. महायुतीमध्ये येताना अजित पवार गटाला लोकसभेच्या नऊ आणि विधानसभेच्या 90 जागा मिळतील, असे आश्वासन भाजपाकडून देण्यात आले होते. त्यामु्ळे तेवढ्या जागा मिळाव्यात, अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अपेक्षा होती. अमित शहा यांच्याबरोबरच्या जागावाटपाच्या बैठकीत सुरुवातीला शिंदे गटाला जेवढ्या जागा मिळतील, तेवढ्याच जागा आम्हाला मिळाव्यात अशी भूमिका राष्ट्रवादीने घेतली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केवळ 4 हून जास्त जागा मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले. यात बारामती आणि तटकरेंचा रायगड लोकसभा मतदारसंघाच्या समावेश असून इतर दोन जागांबाबत चर्चा सुरू आहेत. शिरूर आणि परभणी राष्ट्रवादीला दिल्या जाऊ शकतात. राष्ट्रवादीला 4 पेक्षा अधिक जागा हव्या असतील तर राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी कमळ चिन्हावर लढावे किंवा आम्ही सांगू त्याच उमेदवारांना निवडणुकीत उतरावे, अशी ऑफरही भाजपाने दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी नेते कमालीचे नाराज झाले आहेत. अमित शहा यांच्यासोबत बैठक पार पडल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेत्यांना स्थानिक पातळीवरून नाराजी व्यक्त करणारे फोनही आले. मात्र, लोकसभेला कमी मिळालेल्या जागांची भरपाई विधानसभेच्या जास्त जागा देऊन केली जाईल, असे आश्वासन अमित शहा यांनी दिल्याचे सांगून नेत्यांनी सर्वांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे काल दिल्लीला रवाना झाले. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते. या बैठकीत पुन्हा एकदा अमित शहा यांच्यासह जागावाटपावर चर्चा झाली. ही बैठक रात्री एक वाजेपर्यंत चालली. त्यानंतरही भाजपाची भूमिका बदलली नाही.
दिल्लीतील बैठकीबाबत प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. जागावाटपाच्या बाबतीतील 80 टक्के काम कालच्या बैठकीत झाले. केवळ 20 टक्के काम बाकी आहे. त्यावर चर्चा सुरू आहे. काही विषय उरलेत. लवकरच चर्चा पूर्ण करू. आता 11 मार्चला पुन्हा बैठक असल्याचे सांगण्यात येते. तर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट म्हणाले की, समाधानकारक तोडगा निघाला असून, सोमवारी जागावाटप जाहीर होईल.
शिंदे कल्याणसाठी आग्रही
दिल्लीतील बैठकीत मुंबईतील आपल्या वाट्याची एक जागा भाजपाला देण्याची तयारी शिवसेनेने दाखवली. मात्र, कल्याण आणि ठाण्याच्या जागेवर शिवसेना ठाम असल्याचे सांगितले. कल्याणच्या जागेवर एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे हे गेल्या वेळी निवडून आल्याने शिवसेना ही जागा सोडायला तयार नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top