ऐन दिवाळीत थंडीऐवजी पावसाची शक्यता

मुंबई – पश्चिम बंगालवर धडकलेल्या ‘दाना’ चक्रीवादळाचा परिणाम राज्यात होणार असल्याचे चित्र दिसते. यामुळे राज्यात यावर्षी दिवाळीत थंडी ऐवजी पाऊस पडण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून यामुळे राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती.आज आणि उद्या बहुतांश जिल्ह्यात हवामान कोरडे राहणार असून २६ आणि २७ ऑक्टोबरला राज्यातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली असून त्या जिल्ह्याना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार उद्या विदर्भातील गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. तर रविवारी विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, बुलढाणा, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.