ओढ्याने पात्र बदलल्याने ‘वाल्मिक’चे ग्रामस्थ चिंतेत

ढेबेवाडी – पाटण तालुक्यातील ढेबेवाडी खोर्‍यातील सणबूर ते रुवले मार्गावरील पाटीलवाडीजवळ असलेल्या ओढ्याचे पात्र गेल्या काही दिवसांपासुन बदलत चालले आहे.त्यामुळे वाल्मिक खोर्‍यातील ग्रामस्थ चिंतेत पडले आहेत.या प्रकारामुळे वाल्मिक पठारावरील अनेक दुर्गम गावे आणि वाड्या- वस्त्यांचे दळणवळण विस्कळीत होण्याची भीती आहे.

पाटीलवाडीजवळच्या ओढ्याचे पात्र मुसळधार पावसामुळे बदलत चालल्याने रस्ता खचू लागला आहे.याठिकाणी दोन मोठ्या ओढ्याची पात्रे एकत्र आली आहेत.त्यामुळे पाण्याचा प्रवाह वेगवान बनून ओढा रस्त्याच्या बाजूची जमीन तोडून आत घुसला आहे. त्यातच काही झाडेही उन्मळून पडली आहेत.तर डांबरी रस्त्याचा काही भागही खचून गेला आहे.त्यामुळे या ओढ्याच्या बाजूने संरक्षक भिंत बांधून रस्त्याला आधार देण्याची मागणी रुवले गावचे माजी सरपंच रामभाऊ साळुंखे यांनी केली आहे.