कुनो अभयारण्यात चित्त्यांसाठीदोन हजार चितळ आणणार

भोपाळ – मध्य प्रदेशच्या कुनो अभयारण्यात केंद्र सरकारने राबविलेला ‘प्रोजेक्ट चिता’ हा महत्वाकांक्षी प्रकल्प या ना त्या कारणाने सुरुवातीपासूनच वादात राहिला आहे. त्यात आता नव्या वादाची भर पडली आहे. कुनोमध्ये चित्त्यांसाठी भक्ष्य म्हणून दोन हजार चितळ आणण्यात येणार आहेत.कुनो राष्ट्रीय अभयारण्यात प्रोजेक्ट चिता या प्रकल्पांतर्गत दक्षिण आफ्रिका आणि नामिबिया या देशांमधून चित्ते आणण्यात आले आहेत. कुनोमध्ये आणल्यापासून त्यापैकी अनेक चित्ते मरण पावले. त्यामुळे प्रकल्प वादात अडकला. त्यानंतर या चित्त्यांसाठी बकरे, गुरे कापण्यास कुनोमधील कामगारांनी नकार देत संप केला. त्यामुळे प्रोजेक्ट चिता पुन्हा एकदा वादात सापडला.आता कुनोमध्ये चित्त्यांची संख्या बऱ्यापैकी वाढली आहे. सध्या कुनोमध्ये १३ चित्ते आणि १३ बछडे आहेत. त्यांना शिकार करण्यासाठी हरणांसारख्या प्राण्यांची संख्या कुनोमध्ये आवश्यक तितकी नाही. त्यामुळे आता पेंच, बांधवगड आणि कान्हा या व्याघ्र प्रकल्पांमधून पावसाळ्यानंतर दोन हजार हरणांच्या जातीतील चितळ कुनोमध्ये आणण्यात येणार आहेत.केंद्र सरकारने या निर्णयाला हिरवा कंदिल दाखविला असून प्राणिप्रेमी संघटनांनी त्याला विरोध केला आहे.