मनाली- हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात तेलंगणातील महिला पॅराग्लायडिंग करताना सुमारे २५० मीटर उंचीवरून खाली पडली.यात तिचा जागीच मृत्यू झाला.याप्रकरणी पायलटला पोलिसांनी अटक केली आहे.
मृत महिला पर्यटकाचे नाव नव्या (२६) असे असून ती तेलंगणातील झहीराबाद जिल्ह्यातील सांगा रेडी येथील राहणारी होती. पॅराग्लायडिंग करताना बेल्ट तुटल्याने या महिलेचा मृत्यू झाला.या घटनेनंतर डोभी पॅराग्लायडिंग साइटवर पुढील आदेश येईपर्यंत बंदी घालण्यात आली असून पायलटला अटक करण्यात आली आहे.तसेच पायलट हा नोंदणीकृत होता. त्याने वापरलेल्या उपकरणांना अधिकृत मान्यता देण्यात आली होती,अशी माहिती पर्यटन अधिकारी सुनैना शर्मा यांनी दिली.पोलिसांनी या मृत्यूचा तपास सुरू केला असून आतापर्यंतच्या तपासात मानवी चुकीमुळेच झाला असून याचा हवामानाशी काही संबंध नसल्याची माहिती उघड झाली आहे.उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच महिलेचा हार्नेस मध्यभागी तुटला होता.
दरम्यान,डोभी हे हिमाचल प्रदेशातील कुल्लूमधील सर्वात लोकप्रिय पॅराग्लायडिंग साइट्सपैकी एक आहे.परंतु, दुर्दैवाने, गेल्या काही वर्षांत या ठिकाणाहून अनेक अपघातांची नोंद झाली आहे.अपघातांची संख्या वाढल्यामुळे हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाने जानेवारी २०२२ मध्ये सर्व पॅराग्लायडिंगवर बंदी घातली होती.याआधीही २०२२ मध्ये कुल्लूच्या डोभी परिसरात पॅराग्लायडिंगला गेलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकाचा पडून मृत्यू झाला होता.