नवी दिल्ली – कथित दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला. हा निर्णय अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) केलेल्या अटकेसंबंधी आहे. मात्र केजरीवाल यांना सीबीआयनेही अटक केली असल्याने जामीन मिळाल्यावरही त्यांची तिहार जेल मधून तूर्त सुटका होणार नाही.ईडीने केजरीवाल यांना अटक केली. ईडीच्या या कारवाईला केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.या आव्हान याचिकेवर न्या. संजीव खन्ना आणि न्या. दीपांकर दत्ता यांच्या खंडपिठासमोर १७ मे रोजी सुनावणी पूर्ण झाली होती. न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. आज निर्णय देताना न्यायालयाने सांगितले की, ईडीने केलेल्या अटकेला आव्हान देताना केजरीवाल यांनी मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यातील (पीएमएलए) कलम १९ मधील ‘अटकेची आवश्यकता’ या निकषावर गंभीर कायदेशीर मुद्दे उपस्थित केले आहेत. या मुद्यांवर मोठ्या खंडपिठासमोर सखोल विश्लेषण होणे आवश्यक आहे. त्यामुळे हे प्रकरण तीन जजच्या खंडपिठाकडे वर्ग करण्यात येत आहे. मोठ्या खंडपिठात सुनावणी पूर्ण होईपर्यंत केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर करीत आहोत.दरम्यान, मद्य घोटाळ्याशी संबंधित दुसऱ्या प्रकरणात सीबीआयने अटक केल्यानंतर केजरीवाल यांनी जामीनासाठी केलेला अर्ज प्रलंबित आहे. यावर १७जुलै रोजी सुनावणी आहे . त्यातही जामीन मिळाला तर केजरीवाल जेलमधून मुक्त होतील .
