मुंबई- बेस्ट उपक्रमाला ७०० डबल डेकर बसेसचा पुरवठा करण्याबाबत सतत चालढकल करत आलेल्या
कॉसिस कंपनीला अखेर काळ्या यादीत टाकले आहे. बेस्ट उपक्रमाकडूनच याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यातील जुन्या डबल डेकर बसेस इतिहासजमा झाल्याने नवीन वातानुकूलित डबल डेकर बसेससाठी निविदा मागविल्या होत्या.त्यामधे स्विच मोबॅलिटी आणि कॉसिस कंपनीच्या निविदा मंजूर करण्यात आल्या होत्या.यापैकी कॉसिस कंपनीने ७०० आणि स्विच मोबॅलिटी कंपनीने २००
डबल डेकर बसेस देण्याचा करार करण्यात आला. यामध्ये स्विच मोबॅलिटी कंपनीने २०० पैकी ५० डबल डेकर बसेसचा पुरवठा केला आहे.मात्र कॉसिस कंपनीने नियमानुसार बसेसचा पुरवठा केलेला नाही.बेस्ट उपक्रमाने याबाबत या कंपनीला अनेकदा स्मरणपत्रे पाठवली.मात्र कंपनीने बिलकुल प्रतिसाद दिला नाही.त्यामुळे तत्कालीन महाव्यवस्थापकांनी या कंपनीला काळ्या यादीत टाकण्याचा इशारा दिला होता.हा इशाराही कंपनीने जुमानला नाही. त्यामुळे अखेर कॉसिस कंपनीवर प्रत्यक्षपणे काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करण्यात आली असल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.